Anand Paranjape: तुम्ही मिशन कळवा राबवा, आम्ही कमिशन टीएमसी राबवतो; आनंद परांजपे यांचा इशारा

| Updated on: Dec 31, 2021 | 10:39 PM

आम्हाला पक्षश्रेष्ठी जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आदेश दिले तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. पण, जर ते मिशन कळवा राबविणार असतील तर आम्ही कमिशन टीएमसी राबवू. राष्ट्रवादी सध्या सक्षम विरोधी पक्ष आहे.

Anand Paranjape: तुम्ही मिशन कळवा राबवा, आम्ही कमिशन टीएमसी राबवतो; आनंद परांजपे यांचा इशारा
ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला
Follow us on

ठणे : मिशन कळवाची भाषा करणार्‍यांनी ध्यानात ठेवावे की आम्ही जर कमिशन टीएमसी उघडकीस आणले तर ठाणेकरांना तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. खारीगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम आनंद परांजपे हे खासदार असताना मंजूर करून घेतले होते. हे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी मिशन कळवा सुरू करून संबंध कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानाचा खासदार आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमिशन टीएमसी सुरु करणार

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि महापौर नरेश म्हस्के यांनी काल येणार्‍या वर्षामध्ये मिशन कळवा राबवून संबंध कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, अशा प्रकारची जी मोठी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात शिवसेना मिशन मुंब्रा सुरु करणार आहे. या त्यांच्या घोषणेचे स्वागतच आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी आहे. त्यांच्या या घोषणेचे स्वागत करतानाच येणार्‍या नवीन वर्षामध्ये “कमिशन टीएमसी” म्हणजेच शौचालयापासून कचर्‍यापर्यंत आणि रस्त्यापासून परिवहन सेवेपर्यंत आणि पाण्यापासून स्मार्ट सिटीपर्यंत जे काही कमिशन खाल्ले गेले. त्याबाबत जनजागृती मोहीम राष्ट्रवादी सुरु करणार आहे. अन् याची उत्तरे देताना महापौर नरेश म्हस्के यांचे राजकीय कसब पणास लागेल, याचा आपणाला विश्वास आहे. त्यांच्या कमिशन कळव्याचे स्वागत करताना कमिशन टीएमसी ही मोहीम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात सुरु करतील. म्हणजेच, ठाण्यात न उचलला जाणारा कचरा, घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, टीएमटीचे वाजलेले बारा, स्मार्ट सिटीमध्ये रखडलेले प्रकल्प या सर्वांबाबतची जनजागृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार्‍या वर्षामध्ये करणार आहे, असे परांजपे म्हणाले.

राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्ष

दरम्यान, आम्हाला पक्षश्रेष्ठी जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आदेश दिले तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. पण, जर ते मिशन कळवा राबविणार असतील तर आम्ही कमिशन टीएमसी राबवू. राष्ट्रवादी सध्या सक्षम विरोधी पक्ष आहे. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू, असेही परांजपे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदे यांनी पिंकबुकचा अभ्यास करावा

खारीगाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरुर व्हावे; त्याचे आम्ही स्वागतच करु! ठाणे पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर त्याचे आम्ही स्वागतच करु; पण, एमयुटीपी फेज 1 ते फेज 3 च्या माध्यमातून जे प्रकल्प झाले आहेत किंवा सुरु आहेत त्याची माहिती देणारे रेल्वेचे पिंकबुक नावाचे एक पुस्तक प्रकाशित व्हायचे; त्यामध्ये प्रकल्प कधी मंजूर झाले, त्या वर्षी किती निधी मिळणार आहे, याची माहिती असायची. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये 50 टक्के भागीदारी महाराष्ट्र शासन आणि 50 टक्के भारतीय रेल्वेची असते. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची स्थापना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात झाली होती. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अंतर्गत हे प्रकल्प सुरु आहेत. त्याद्वारे होणार्‍या प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी करावे. तो त्यांचा अधिकार आहे. पण, त्या आधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे पिंकबुक जरुर वाचावे, अभ्यास करावा; म्हणजे, हे प्रकल्प कधी मंजूर झाले व ते मंजूर होण्यासाठी कोणी पाठपुरावा केला हे त्यांना कळेल, असा सल्लाही परांजपे यांनी श्रीकांत शिंदेंना दिला.

महापौरांना डोळे मारायची सवय

महापौरांना त्यांना डोळे मारुन, इशारे करुन भांडणे लावायची खूप सवय आहे. त्यांच्यासबोत मी खूप दिवस काढले आहेत. त्यांच्या स्वभावातील हे गुणवैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या डोळे मिचकवण्यावर मी काही भुलणार नाही. त्यांचे डोळे मिचकावणे त्यांनी त्यांच्यापर्यंतच ठेवावे, असा टोलाही आनंद परांजपे यांनी महापौर म्हस्के यांनी लगावला. (NCP’s Thane city president Anand Paranjape’s warning to Mayor Naresh Mhaske)

इतर बातम्या

Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग

Kalyan Crime: पती-पत्नीने मित्रांच्या मदतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुटले, सीसीटीव्हीच्या सहाय्याने लागला गुन्ह्याचा छडा