सुनिल घरत, शहापूर : शहापूरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या खरीवली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यात भातसा कॅनलचे पाणी यामुळे वर्षातील सर्व 12 महिने या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. चिखलाने भरलेले खड्डे तुडवत प्रवास करावा लागत असल्यानं नागरिक बेजार झालेत. शहापूर तालुक्यातील गाव, खेड्या-पाड्यात अतिदुर्गम भागात सुद्धा चकचकीत रस्ते झालेत. मात्र, शहापूरपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या खरीवली गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नाही.
VIDEO: वर्षातील 12 महिने चिखलातून प्रवास, शहापूरमधील खरीवली गावात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ताच नाही@mieknathshinde @AshokChavanINC @OfficeofUT #Road #Kharivali #Shahapur #Thane #रस्ता #खरीवली #शहापूर #ठाणे pic.twitter.com/tBh6TgF0TG
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 7, 2021
70 घरांचे खरीवली गाव असून 350 च्या आसपास लोकसंख्या आहे. या गावात कुणबी, आदिवासी,बौद्ध, वारली समाज्याची लोक राहत आहेत. गावात जाण्यासाठी नागरिक ज्या रस्त्याचा वापर करत आहेत. ती जागा एका स्वतंत्र मालकाची मालकी हक्काची असल्याने गावातील स्थानिक राजकारणामुळे तिसऱ्या पिढीपासून जागा मालकाने पूर्ण गावाला वेठीस धरले असून मालक गावात जाणारा रस्ताच करून देत नाही.
खरीवली गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी जागा मालकाशी मिटिंग करून रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळ प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अटी शर्यती ही मान्य केल्या आहेत. एक वेळ कुटुंबातील सदस्याला ही उपसरपंचही केले होते. स्वतःच्या फायद्यासाठी जागा मालकाने रस्ता देण्यासाठी अनेक वेळ होकार सुद्धा दिलेला परंतु “रात गेली की बात गेली” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावात कुणी आजारी पडले तर मुख्य रस्त्यापर्यंत त्या रुग्णाला उचलून न्यावे लागत आहे. शाळकरी मुलांना शाळेत जातांना चिखलातून वाट काढत जावे लागत आहे, गावात मयत झाले किंवा कोणता ही कार्यक्रम असला तर त्यावेळी बाहेरील पाहुण्यांना गावापर्यंत जाण्यासाठी पायी चिखलाची वाट तुडवत जावे लागत असल्याने पाहुणे अक्षरशः गावातील नागरिकांना शिव्याच देऊन जातात.
खरीवली गावातील नागरिकांना ही वाटत आहे की, आपल्या गावाचा रस्ता ही तालुक्यातील इतर गावांसारखा झाला पाहिजे, परंतु गावातील एकाच कुटुंबाने गावकऱ्यांना वेठीस धरल्यामुळे त्यांचे पूर्ण प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. गावात होत असलेल्या अंतर्गत गावपातळी वरील भानगडी व गावपातळीवरील होत असलेले राजकारण या सारख्या गोष्टींमुळे पूर्ण गावाला वेठीस धरले जात आहे. स्वातंत्र्य काळापासून तालुक्यातील खरीवली हे गाव चकाचक रस्त्यापासून आतापर्यंत मुकले आहे.
या संदर्भात खरीवली गावातील नागरिक, तरुण वर्गाने एकत्र येऊन ही लढाई लढण्यासाठी आता आम्ही लोकन्यायल्यायात जाऊन लढणार असल्याचे सांगितले आहे.