ठाणे | 16 डिसेंबर 2023 : दोन दिवसांपूर्वी चार जणांनी संसद आणि संसदेच्या बाहेर घुसखोरी करत मोठा राडा केला. दोन जणांनी संसदेत जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संसद आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडून सरकार विरोधात रोष व्यक्त केला. बेरोजगारीच्या मुद्द्यावर या तरुणांनी संसदेत घुसखोरी करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या चारही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू झाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कल्याणमध्येही असल्याचं सांगितलं जात असून कल्याणमध्येही झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
संसदेत घुसखोरी केलेल्या तरूणांनी धुराच्या नळकांड्या कल्याण शहरातून खरेदी केल्या होत्या, असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर कल्याणमधील पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर प्रसारित वृत्ताच्या आधारे शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी करण्यास सुरू केली आहे. मात्र तेवढ्या क्षमतेच्या धूर नळकांड्या विकत नसल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुकानात असलेल्या फटाक्यांचे आणि नळकांड्यांची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच परिसरातील इतर दुकानांचीही पाहणी केली.
संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे सापडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खरेदी केल्याची बातमी आली होती. या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खेरदी केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यामुळे दिल्लीतील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच कल्याण पोलीस कामाला लागले. कल्याण पोलिसांनी तातडीने स्थानिक फटाके विक्रेत्यांची कसून चौकशी सुरू केली.
काल दुपारी कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी संसदेत वापरलेले तेवढ्या क्षमतेच्या धूर नळकांड्यांची कल्याणमध्ये विक्री होत नसल्याचे दुकानदारांनी सांगितलं. पण पोलिसांनी फटाके विक्रेत्यावर विश्वास न ठेवता दुकानात असलेल्या फटाक्यांचे आणि नळकांड्याची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच या सर्व गोष्टींची नोंदही पोलिसांनी करून घेतली आहे. सध्या अश्याप्रकारे अनेक दुकानदारांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. परिसरातील इतर दुकानातही असाच तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून अनेकदा आणि अचानक तपास करण्यात येत असल्याने व्यापारी घाबरून गेले आहेत. आपल्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे असा सवाल हे विक्रेते विचारत आहेत.