मीरा भाईंदर: भाईंदर पूर्वमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या फेरीवाला पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. भाईंदर पूर्वच्या बी.पी. रोड परिसरात ही घटना घडली. हल्लेखोर फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पाच जणांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भाईंदर पूर्वेच्या बी.पी. रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या दरम्यान फेलीवाल्यांकडून फेरीवाला पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. फेरीवाला पथकातील अधिकारी प्रशांत पाटील यांना फेरीवाल्यांनी घेराव घालत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास शंभरपेक्षा अधिक फेरीवाल्यांनी कारवाईसाठी गेलेल्या पालिक कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या प्रकरणी महापालिका अधिकारी प्रशांत पाटील यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान मुंबई आणि परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी, ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील फेरिवाल्याने हल्ला केला होता. या घटनेत त्यांना आपल्या हाताची दोन बोट गमवावी लागली होती. तसेच या हल्ल्यात त्यांचा आंगरक्षक देखील गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Skoda ची शानदार Sedan या आठवड्यात बाजारात, लाँचिंगपूर्वी जाणून घ्या कारबद्दल 5 खास गोष्टी
Health Care : या हेल्दी स्नॅक्सचा आहारात समावेश करा, वाढलेले वजन कमी होईल!