सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 20 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याच्या घटनेला काही दिवस होत नाही तेवढ्यात कल्याणमध्ये आणखी एक राड्याची घटना समोर आली आहे. गणपत गायकवाड यांचे बंधू अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. संबंधित घटनेमुळे परिसरातील खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली आहे. स्वरूप सोरटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोनार, करण गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून उर्वरित दोघांची ओळख पटविली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा आणि या घटनेचा कोणताही संबंध नाही, असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित घटना ही सोमवारी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण पूर्वेतील तिसाई केबल कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अनोळखी इसम चावी लावत असल्याचे पाहताच, दुचाकीचा मालक सागर गायकवाड याने त्याला हटकले. त्याचा राग आल्याने नशेत असलेल्या या तरुणाने कार्यालयात घुसून सागरला शिवीगाळ केली. तसेच ठोशाबुक्क्यानी मारहाण केली. यानंतर त्याने आपल्या आणखी 5 साथीदाराना बोलावून घेतले.
यावेळी सागरला सोडविण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल भिसे मध्ये पडले. पण आरोपींना त्यांनाही मारहाण करून जखमी केले. आरोपींनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडावर, नाकावर मानेवर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. तसेच काचेच्या तुकड्याने सागरच्या मनगटावर वार केले. या मारहाणीत सागर जखमी झालाय.
याप्रकरणी सागर गायकवाड यांच्या तक्रारीवरुन मानपांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसेच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत चौघांना अटक केली आहे. दरम्यान, हा वाद आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील नसून कार्यकर्त्यानी शांत राहावे, असे आवाहन कोळसेवाडी पोलिसांनी केले आहे. तर या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.