अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. पण पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं आहे. पोलीस हेल्मेट घालून रेल्वे रुळावर उतरले. त्यांनी आंदोलक पुरुष आणि तरुणांना लाठ्यांचा प्रसाद दिला. तर महिलांना सुरक्षितपणे बाजूला केलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आलं.
बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुन देखील आंंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. आंदोलकांनी जवळपास 9 तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. मंत्री गिरीश महाजन स्वत: रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आरोपीवर कठोरात शिक्षा होईल, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं होतं. पण तरीही आंदोलक हटले नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसांना आदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली.
आंदोलनानंतर पोलिसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. आंदोलक सकाळपासून रेल्वे रुळावर जमले होते. आंदोलकांना वारंवार विनंती केली जात होती. पण आंदोलक रेल्वे रुळावरुन हटण्यास तयार नव्हते. अखेर लाठीचार्ज करुन जमाव पाच मिनिटात रेल्वे रुळावरुन हटवण्यात आलं आहे. हे ऑपरेशन होणं गरजेचं आहे. रेल्वे वाहतूक सुरु व्हायला हवी. यासाठी रेल्वे प्रशासनला आम्हाला अहवाल पाठवायचा आहे. यानंतर रेल्वे वाहतूक सुरु होईल”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचं स्वरुप आलं आहे. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि स्थानकाच्या बाहेरील गर्दी हटवली आहे. पोलीस सर्व परिस्थितीकडे बारकारईने लक्ष देवून आहेत.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. यावेळी आंदोलकांनी पोलिसांची गाडी उलटली. तसेच आणखी एका गाडीच्या काचा फोडल्या. गाड्यांची अवस्था पाहून आंदोलक किती आक्रमक होते याची जाणीव होत आहे. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी आहे. संपूर्ण बदलापूर स्थानकाला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे.