पोलीस घटनास्थळी, आंदोलकांची धरपकड, परिस्थिती तणावाची, अक्षयवर अंत्यसंस्कार तिथेच होणार?

| Updated on: Sep 29, 2024 | 4:38 PM

उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर दफनविधी होणार आहे. पण स्थानिकांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे स्थानिकांनी दफनभूमी येथे दाखल होत दफनविधीसाठी खोदलेला खड्डा बुजवला. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

पोलीस घटनास्थळी, आंदोलकांची धरपकड, परिस्थिती तणावाची, अक्षयवर अंत्यसंस्कार तिथेच होणार?
अक्षय शिंदे
Follow us on

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उल्हासनगरची जागा पोलिसांनी निश्चित केली आहे. पोलिसांकडून गेल्या तीन ते चार दिवसांपासून अक्षय शिंदे याच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जागा शोधली जात होती. पण सर्वच ठिकाणी स्थानिकांचा विरोध होत असल्याने अक्षय शिंदे याचा मृतदेहाच्या दफनविधीसाठी पोलिसांना जागा मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथे असलेल्या दफनभूमीत अक्षयच्या मृतदेहास दफन करण्याचं ठरवलं. त्यासाठी पोलिसांकडून शांतीनगरच्या दफनभूमी येथे खड्डाही खोदण्यात आला. पण स्थानिकांना याबाबतची खबर लागताच ते तिथे दाखल झाले. स्थानिक महिलांनी अक्षय शिंदे याच्या दफनविधीस विरोध केला. यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. आंदोलकांनी यावेळी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी खोदलेला खड्डाही बुजवला.

संबंधित घटनेनंतर स्थानिक पोलीस तिथे दाखल झाले. पोलिसांनी अक्षयच्या दफनविधीस विरोध करणाऱ्या आंदोलकांची धरपकड केली. महिला पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दफनभूमी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनात तृतीयपंथीदेखील सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांनादेखील ताब्यात घेतलं आहे.

अक्षय शिंदेचा मृतदेह सध्या कुठे?

अक्षय शिंदे याचा मृतदेह सध्या कळवा रुग्णालयात आहे. गेल्या सहा दिवसांपासून अक्षयचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयात आहे. अक्षय शिंदे याचा मृतदेह आता थोड्या वेळाने कळवा रुग्णालयातून बाहेर काढण्यात येणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कळवा रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचा मृतदेह घेऊन पोलीस कळवा रुग्णालयातून बाहेर निघाले आहेत. पोलीस अक्षयचा मृतदेह घेऊन उल्हासनगरच्या स्मशानभूमीच्या दिशेला रवाना झाले आहेत.

उल्हासनगरच्याच स्मशानभूमीत दफन होणार?

दरम्यान, उल्हासगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीचा परिसर आता पोलिसांकडून मोकळा करण्यात आला आहे. अक्षय शिंदे याचा मृतदेह याच स्मशानभूमीत दफन केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तयारी केली जात आहे. स्मशानभूमी परिसरातून सर्वानाच पोलिसांनी बाहेर काढलं आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास खड्डा खोदला होता. पण स्थानिक महिला आणि शिवसेना कार्यकर्त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी दफनभूमी ठिकाणी दाखल होत खड्डा बुजवला. पण आता पुन्हा तिथे जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्याचं काम सुरु झालं आहे.