गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 4 नोव्हेंबर 2023 : आजकाल संजय राऊत यांना लोकांचा काय काय पाहायचं असतं? स्वतः राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे हे जर आम्ही बोललो तर मग तुम्हाला कळेल. कोणत्या हॉटेलवर राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिल कोण भरायचं हे समजले. जे आज तुमच्या नावाने रडत आहेत, तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे, असं सांगतानाच कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका, असं आवाहन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कोणत्याही खासदाराने ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात तो चुकीचा आहे. आपलं झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असेल तर त्याला पुराव्यासहीत चोख उत्तर दिलं जाईल. हॉटेलच्या नावासहीत, रूम नंबर सहीत सर्व पुरावे देऊ शकतो, असा इशाराच आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.
एल्विश यादव प्रकरणावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. एल्विश यादववर काही लोकांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असं स्वतः यादवने सांगितल आहे. हिंदुत्वावर बोलणाऱ्या, लोकप्रिय असणाऱ्या माणसावर कुठलेही आरोप करून त्याला कोणत्याही प्रकारे अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत.राऊत आणि त्यांच्या ठाकरे गटाने हिंदुत्व तर सोडलेलच आहे. परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत.
मला वाटतं हे चुकीचं आहे. तो जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. पण विनाकारण आरोपी बनवण्याचा प्रकार बरोबर नाही. म्हणून आम्ही त्याच समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकार जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत पोपट आहे. ते सध्या पोपटाच्या भूमिकेत आहेत. आधी दलालाच्या भूमिकेत होते. आता पोपटाच्या भूमिकेत आहेत म्हणून त्याची चिंता करू नका. सरकार काही जाणार नाही. जाणार असतील तर हे जाणार आहेत. त्यांच्याजवळ असलेले 15 आमदार जाणार आहेत. 31 डिसेंबर नंतर त्यांचे 15 आमदार शिवसेनेकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो, असा दावा त्यांनी केला.
ललित पाटीलसह 14 लोकांवर कारवाई केलेली आहे. तो आता 10 वर्ष तरी सुटणार नाही. तुरुंगातून सुटणार नाही या भीतीपोटी तो पळाला हे त्याने कबूल केलेलं आहे. त्यामुळे अशा ड्रग्स माफियाच्या मागे जो कोणी असेल मग तो आमदार, खासदार, मंत्री असो त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे. आम्ही स्वतः ती मागणी करतोय. समाजाला बिघडवणारा कोणताही ड्रग्स माफीया असला तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्या संबंधित जरी कोण असेल तर त्यालाही जेलमध्ये टाकलं पाहिजे हि स्पष्ट भूमिका शिंदे सरकारची आहे, असं ते म्हणाले.
मनसे नेते राज ठाकरे यांनी वरळीच्या बीडीडी चाळीची पाहणी केली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. वरळी कुण्या एकट्याची प्रॉपर्टी आहे का? वरळीमध्ये असलेले मुस्लिम, दलित बांधव, पोलीस कर्मचारी, त्या पोलीस कर्मचा एक हक्काचं घर मिळावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 16 लाखांमध्ये घर मिळण्याची पोलिसांची मागणी होती.
ते देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्याला समर्थन देण्यासाठी जर राज ठाकरे गेले असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. माझ्या मतदारसंघात येऊन जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्यांचं स्वागत करा, मतदारसंघ ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला त्यांनी लगावला.