‘अरे लाज वाटली पाहिजे’, मणिपूरच्या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं

| Updated on: Jul 29, 2023 | 10:10 PM

"राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

अरे लाज वाटली पाहिजे, मणिपूरच्या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई | 29 जुलै 2023 : “हिंदुत्व काय आहे? फक्त मंदिरमध्ये जाणारा घंटा बडवणारा हिंदू नकोय. आम्हाला अतिरेक्यांना मारणारा हिंदू हवा आहे. आमची वज्रमूठ सभेला सर्व जातीचे लोक आले होते. या लोकांनी नकली हिंदूंनी सभास्थळी जावून गोमूत्र शिंपडलं. अरे माणसासारखी माणसं सभेला आली होती आणि त्यांना तुम्ही अपित्र मानता? आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हातात काम असं आमचं हिंदुत्व आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारला सुनावलं. ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारला ध्रुतराष्ट्राची उपमा दिली.

“माणसा-माणसामध्ये भेद करणाऱ्याचा मुखवटा फाडून काढायचा आहे. मणिपूर जळत आहे. हेच आपलं हिंदू राष्ट्र आहे? मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बोलायचं सुरु होतं. ज्या हनुमानने सीतेसाठी लंका जाळली, सीता हरण झालं म्हणून रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अरे लाज वाटली पाहिजे’

“दु:खाची गोष्ट तर हीच आहे की, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिथे ध्रुतराष्ट्र राजा बसले होते. त्यांना दृष्टी नव्हती. आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केलं ते व्हिडीओमुळे समोर आलं. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.

‘राष्ट्रपती महिला आहेत, राज्यपाल महिला आहेत, काय करत आहेत?’

“राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? तिथल्या राज्यपाल महिला आहेत. त्या काहीच करत नाहीत. आमच्या इथे जे राज्यपाल होते ते कशी मस्ती करत होते. त्यांना पाठवा तिथे. मंदिर उघडा ते उघडा. कोरोना संकट एवढं सोपं होतं का? असे राज्यपाल तिकडे का पाठत नाहीत?”, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.

“मी विरोधी पक्षांची एकजूट मानत नाही तर ज्या सर्व पक्षांची एकजूट झालीय तिचं नाव इंडिया आहे. पण इंडियावरही त्यांनी टीका केली. त्यांनी इंडिया मुजाहीद्दीन म्हणत टीका केली. पंतप्रधान एक-दोन दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. गद्दारांसोबत बसणार आहेत. त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच आपलं हिंदुत्व आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.