कल्याण लोकसभा मतदारसंघात आता सर्वात मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. हा मतदारसंघ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. पण यावेळी श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळेल की नाही? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं होतं. महायुतीत कल्याणच्या जागेबाबतचा तिढा अनेक दिवस ताटकळत राहिलेला बघायला मिळाला होता. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असूनही त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ लागल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे उमेदवार असतील, असं जाहीर केलं होतं.
श्रीकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालीय. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवातही झाली आहे. असं असताना आता ठाकरे गटाकडून मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता होती. कारण ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आगामी काळात आव्हान वाढतं का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
कल्याण लोकसभा निवडणुकीत ट्विस्ट आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणमधून ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर रमेश जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट 6 तारखेला एबी फॉर्म बदलण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे कल्याणमधील घडामोडींकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचं फार चांगलं आहे, असं म्हणता येणार नाही. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदाराने शिवसेनेच्य शहराध्यक्षावर पोलीस ठाण्यात गोळीबार करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील मतभेदाच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. पण सध्या मतदारसंघात दोन्ही पक्षाचे पदाधिकारी सोबत असल्याचा दावा करत आहेत.
श्रीकांत शिंदे यांच्यासाठी यावेळची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. कारण याआधीच्या दोन निवडणुका ते सहज आणि मोठ्या फरकाने निवडून आले होते. पण यावेळी शिवसेना पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.