कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून गाईची तस्करी, पोलिसांना पाहून आरोपी फरार

| Updated on: May 05, 2023 | 11:28 AM

गुंगीचे औषध देत बेशुद्ध झालेल्या गाईना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी छापा मारून एक आरोपीला ताब्यात घेत 2 गाईची सुटका केली आहे. तर 5 आरोपी फरार झाले आहेत.

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून गाईची तस्करी, पोलिसांना पाहून आरोपी फरार
Follow us on

सुनील जाधव, कल्याण : कल्याण पश्चिमेत गाईला गुंगीचे औषध देत स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी छापा मारत सोयब निजाम करके या आरोपीला रंगेहाथ पकडत 2 गाईची सुटका केली आहे. पोलिसांनी एक रिक्षा आणि 2 स्विफ्ट गाड्या ही जप्त केल्या आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या 5 आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलिसांना कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर खाडी परीसरात जीन्स कारखान्याजवळ सार्वजनिक मोकळी जागा आहे. या ठिकाणी गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस यांना मिळाली होती. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एपीआय अरुण घोलप, पोलीस हवालदार साळवी, बागुल, बाविस्कर, पावसे व पोलीस नाईक फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडीकिनारी छापा मारत सोयब निजाम करके वय वर्ष 32 याला रंगेहात पकडत 2 गाईंची सुटका केली. तर या छापेमारी दरम्यान इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, अरबाज, गोरू, मच्छी, आवली, बारक्या असे पाच आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी संगनमत करून ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गाईला आणि बैलाला गुंगीचे इंजेक्शन मारायचे आणि नंतर ही जनावर खाली पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये भरून गाईंची वाहतूक करायचे.

कोणत्याही प्रकरची कायदेशीर परवानगी नसताना गोवंश जातीच्या जनावरास क्रूरपणे धारधार हत्यारांनी ठार मारून त्यांचे अवयव विक्री करायचे. सध्या बाजारपेठ पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार या आरोपीवर गुन्हा दाखल करत एक रिक्षा आणि 2 स्विफ्ट गाड्या, लोखंडी सुरा हस्तगत केल्या असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.