ठाण्यात प्रेयसीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितेनं केली होती. घोडबंदर इथल्या वाघबीळ भागात राहणाऱ्या प्रिया सिंह या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने अश्वजित गायकवाड यांच्याशी गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी आता सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नीला गोखले यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलंय. प्रिया सिंह तिचा बॅग उचलत असताना एसयूव्हीमधून पडली होती, अशी माहिती ठाण्याच्या सहपोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
11 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4.30 वाजता अश्वजीत याने घोडबंदर इथल्या एका हॉटेलजवळ मला भेटायला बोलावलं होतं. तिथं आमच्यात वाद झाल्यानंतर त्याने मारहाण करत मोटारीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप प्रिया सिंहने केला होता. त्यानंतर एफआयआर रद्द करण्यासाठी अश्वजित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर या गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न झाला असून त्यात बलात्काराचीही कलमं वाढवण्याची मागणी प्रियाने केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देण्याचीही मागणी तिने केली आहे.
अश्वजित गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला म्हणजेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्स प्रिया सिंहला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली होती. सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. राज्य महिला आयोगानेदेखील पोलिसांकडून याप्रकरणी अहवाल मागितला होता. प्रिया सिंह प्रकरणांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. आरोपीचे वडील उच्च पदस्थ आहेत. त्याशिवाय राजकीय वरदहस्तामुळे आरोपीला अटक होत नसल्याची टीका करण्यात आली होती.