राज ठाकरे यांची राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोर्टाचा निर्णय…

| Updated on: May 12, 2023 | 12:21 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मिश्किल भाष्य केलं.

राज ठाकरे यांची राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोर्टाचा निर्णय...
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालात शिंदे सरकारला अभय मिळालं आहे. मात्र, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्याच बाजूने निकाल आल्याचे दावे दोन्ही बाजूने होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याविरोधात केसेस सुरू असताना मला कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस यायची. त्या नोटीशीतील भाषा अत्यंत किचकट असते. त्यातून मला अटक केलीय की सोडलंय हेच कळत नाही. काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. प्रोसेज चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता.
विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. बाहेरचाच पक्ष राहिला पाहिजे. मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार? कोर्टाचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

माझा वेळ वाया घालवू नका

उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारेने राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे, असं विचारलं असता, उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यांचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे. माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलंच पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला होता. आताही मुख्यमंत्र्यांना तोच सल्ला देणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे. आधीचे नाही राहिले त्यामुळे हे सर्व घडलं आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

अंदाज घेण्यासाठी आलो

यावेळी त्यांनी ठाण्याच्या दौऱ्यावरही भाष्य केलं. विधानसभा आणि लोकसभेचा अंदाज घेण्यासाठी मी दौऱ्यावर आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेणार आहे, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी कोणत्या पक्षाबरोबर युती करणार या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.