कल्याण: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविडची लस घेण्यावर अधिक भर दिला आहे. तर काही लोक अजूनही लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. अनेकजण तर लस न घेण्यासाठीच्या पळवाटा शोधताना दिसत आहेत. डोंबिवलीत तर एकाने लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी केली. पण लस घेण्याची वेळ आली तेव्हा पळ काढला. त्यामुळे कर्मचारीही त्याच्या मागे सुसाट धावले. हा सर्व प्रकार पाहून लसीकरण केंद्रावरील नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
कोरोनाच्या तिसऱ्या पार्श्वभूमीवर सरकारने नियम कडक करताना कोरोना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी वाढत आहे. मात्र अनेकजण यातही पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
डोंबिवली पूर्वेकडे नेहरू मैदानात पालिकेने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ऋषीकेश मोरे या 29 वर्षीय तरूणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले. मात्र त्यांनतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला. सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाना केला असता कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्या नंतर जाण्यास सांगितले. यानंतर तो चक्क पळून जाऊ लागला. तेव्हा सेंटरवर असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ढकलून देत तो लस न घेताच पळून गेला.
या घडल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून सदर व्यक्तीला शोधून काढत त्याचे लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र दुसरा डोस असतानाही त्याने लस घेण्यास टाळाटाळ केल्याने पहिला डोस देखील त्याने घेतला आहे की केवळ कागदोपत्री नोंद करून प्रमाणपत्र मिळवले आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 23 December 2021#Fastnews #news https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/UDVQe7JSOL
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2021
संबंधित बातम्या:
‘शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, महिला अत्याचाराला आळा बसणार? काय आहे शक्ती कायदा?
Letter to PM | नाशिक जिल्ह्यातल्या 400 विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र…