श्रीकांत शिंदे यांना झटका देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन, फायरब्रँड नेत्याला कल्याण लोकसभेत उभं करण्याची मागणी

| Updated on: Jan 15, 2024 | 6:49 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांच्या या दौऱ्यावर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली होती. त्यानंतर आगामी निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गट पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा जागेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदे यांना झटका देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन, फायरब्रँड नेत्याला कल्याण लोकसभेत उभं करण्याची मागणी
Follow us on

सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 15 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत आहे. ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुषमा अंधारे या आक्रमक नेत्या आहेत. त्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना अतिशय प्रभावीपणे बोलतात. त्यामुळे त्यांना कल्याण लोकसभेत उमेदवारी दिली तर त्या शंभर टक्के जिंकून येतील, असं मत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा. त्यामुळे सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला होता. या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आमच्याबाजूने कल, ठाकरे गटाचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा ही आमची शिवसेना जिंकणार, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच त्यांनी विजयी सभेचं ठिकाणही जाहीर केलं आहे. या दरम्यान डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदार कोण व्हावा? या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमच्याबाजूने कल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तरी काहीच टेन्शन नाही”, असं मत त्यांनी मांडलं.

“सुभाष भोईर आहेत. लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी सुचविले होते. सुषमा अंधारे यांना द्यावे, हा मतदारसंघ त्यांच्या फेव्हरचा आहे. विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत”, असं मत विवेक खामकर यांनी दिलं. ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यावर “खासदार शिंदे यांच्या डोळ्यांवर चामड्याचे चष्मे आहेत. ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुठेही विकला न जाणारा कट्टर शिवसैनिक होता. जो क्राऊड आला त्याला आवरताना नाकी नऊ आले”, असं विवेक खामकर म्हणाले.