ठाणे जिल्ह्यात धबधबे, नदी, धरण परिसरात जाणे टाळे, अन्यथा बसतील पोलिसांचे फटके, नेमका आदेश काय?

| Updated on: Jul 04, 2024 | 3:23 PM

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक जण नदी, तलाव, धबधबे, धरण परिसरात जातात. पण पावसामुळे या भागात जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा परिसरात जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यात धबधबे, नदी, धरण परिसरात जाणे टाळे, अन्यथा बसतील पोलिसांचे फटके, नेमका आदेश काय?
ठाणे जिल्ह्यात धबधबे, नदी, धरण परिसरात जाणे टाळे, अन्यथा....
Follow us on

पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक नागरीक हे पावसाचा आनंद घेण्यासाठी तसेच निसर्गाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी नदी, धबधबे, धरण परिसरात जातात. पण पावसाळ्यात अशा परिसरात गेल्यामुळे काही वेळेला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण वाहून जाण्याच्या घटनादेखील घडतात. अशा घटना दरवर्षी आणि सातत्याने घडत आल्या आहेत. विशेष म्हणजे नुकतंच भुशी डॅमवरही तसाच प्रकार बघायला मिळाला. भुशी डॅमवर फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील पाचही जण वाहून गेले. कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेचं गांभीर्य ओळखून ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आलेत. या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे, नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आलीये. या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट , गोरखगड या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार

याशिवाय भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सीआरपीसी कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले आहेत. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली आहे.