निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया उमटत असतानाच राजा ठाकूर यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्सक्ल्यूझिव्ह संवाद साधला आहे. यावेळी राजा ठाकूर यांनी आपल्यावरील सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत. जोपर्यंत मी ठाकरे गटात होतो, तेव्हा गुंड नव्हतो. आता मी गुंड झालोय का? असा सवाल राजा ठाकूर यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि खोटे आहेत. राऊत यांना सकाळी उठून काही तरी बोलायचं असतं. प्रसिद्धी मिळवायची असते. त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांना काही तरी बोलून काही तरी मिळवायचं आहे. माझा संजय राऊतांशी काय संबंध आहे? काय घेणंदेणं आहे? श्रीकांत शिंदे यांना हीच कामे आहेत काय? असा सवाल राजा ठाकूर यांनी केला.
श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे माझे फोटो व्हायरल झाले आहेत. ते कबड्डी टुर्नामेंटचे आहेत. ठाणे जिल्ह्याची टुर्नामेंट होती. पोलिसांची परवानगी घेऊन स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती. ते सर्व पाहून श्रीकांत शिंदे त्या स्पर्धेला उपस्थित होते. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. हेच आमचे संबंध आहेत, असं राजा ठाकूर यांनी सांगितलं.
मी राऊतांविरोधात शंभर टक्के तक्रार करणार आहे. गुंड बोलण्याचा अधिकार राऊत यांना कोणी दिला? काय अधिकार आहे त्यांना? आमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आम्हाला गुंड बोलतील. भांडूप-कांजूरच्या खासदारांचा काय संबंध?; असा सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख होते. माझी पत्नी शिवसेनेकडून निवडणुकीला उभी होती. तेव्हा आम्ही समाजसेवक होतो. आता उद्धव ठाकरेंकडे शिवसेना राहिली नाही आणि संजय राऊतांकडे कोणी उरलं नाही. आम्ही आता शिवसेनेत नाही म्हणून आम्ही गुंड झालो का? त्यांच्या सुपाऱ्या घेतल्या का? असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेकडून पत्नी उभी होती. आम्ही शिवसैनिक आहोत. 2017मध्ये कळवा प्रभागातून माझी पत्नी शिवसेनेच्या तिकीटावर उभी होती. त्या प्रभागाचे श्रीकांत शिंदे खासदार होते. तेव्हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते. उमेदवारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी टीम पाठवली होती. या टीमने माझ्या पत्नीची मुलाखत घेतली आणि तिकीट दिलं.
तेव्हा उमेदवार योग्य होता. उमेदवाराचा नवरा गुंड नव्हता. आज गुंड आहे, असा चिमटा काढतानाच संजय राऊतांच्या विरोधात आम्ही केस करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.