ठाणे : कोरोना रुग्णवाढीने महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai Corona) डोकं वर काढलंय. हा संसर्ग ठाण्यापर्यंत पोहोचलाय वेळ लागणार नाही. त्यामुळे ठाणेकरांनी (Thane) यंदा 31 डिसेंबर आणि नववर्षाचे (New year Celebration) स्वागत घरीच साधेपणाने साजरं करण्याचं आवाहन ठाणे महापौर (Mayor) आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave india) पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण आवाहन असून ठाणेकर या आवाहनला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोरोना रुग्णवाढ आणि ओमिक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 डिसेंबर, 2021 रोजी आणि 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावं, असं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन या व्हेरीएंटमुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झालाय. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरतं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी नव्या वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमांचं पालन ठाणेकरांनी करावं, असंही आवाहन करण्यात आलंय.