ठाणे : ठाणे शहरात मान्सून कालावधीत खाडी, तलाव अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्यावतीने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रशिक्षित जलतरणपटूंची (स्विमर्स) नेमणूक करण्यात येणार आहे (Thane Municipal appointing swimmers to save life of people who drown in rainy season).
एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार जलतरणपटूंची नेमणूक
ठाणे शहरात सध्या कोणतेही दुर्घटना घडल्यास घटनस्थळी जावून नागरीकांच्या जिवीताचे रक्षण करणे तसेच वित्तहानी टाळण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत आहे. महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीकरिता करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मान्सून कालावधीत खाडीत माणूस बुडणे, अतिवृष्टीमुळे नाल्यात माणसे वाहून जाणे अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे त्यांनी अशा परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित स्विमर्सची नेमणूक करण्याचे निर्देश दिले होते.
12 जलतरणपटूंची नेमणूक करण्यात येणार
एकनाथ शिंदेच्या सूचनेनुसार महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात तीन सत्रात प्रशिक्षित स्विमरची नेमणूक करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सूनच्या 4 महिन्यांकरिता प्रत्येक सत्रात 4 अशी स्विमरची नेमणूक करण्यात येईल. याप्रमाणे तीन सत्रात एकूण 12 स्विमरची नेमणूक करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या संरक्षणासाठी महत्त्वपू्र्ण निर्णय
दरम्यान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पोहण्यात पारंगत असणाऱ्या स्विमरची नेमणूक केल्यामुळे खाडी, नाले अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरीकांच्या जिवीताचे रक्षण करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे (Thane Municipal appointing swimmers to save life of people who drown in rainy season).
हेही वाचा : कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी ठाणे पालिकेचे धोरण जाहीर; महापालिका आयुक्तांनी केलं ‘हे’ आवाहन!