ठाणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी साफसफाई आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश दिले. या कालावधीत सर्व यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे आदेश दिले.
महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज सकाळी वंदना बस डेपो येथून मुसळधार पावसात चालतच साफसफाई आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती कारागृह येथील साफसफाई तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.
महाराष्ट्र सरकार आणि हवामान खात्याने एमएमआर क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शहरात गेल्या दोन दिवसात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर लहान-मोठे वृक्ष पडल्याची घटना घडली असली तरी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सतर्कतेने आणि जलद प्रतिसादामुळे सर्व वृक्ष तात्काळ हटविण्यात आले आहे. आता संबंधित रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीच्या या पार्श्वभूमीवर विपिन शर्मा यांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून काल रात्रीपासून कक्षाकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत अतिवृष्टी कालावधीत नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देतानाच सर्व नाल्याची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित व वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
दरम्यान, अतिपर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहनही विपिन शर्मा यांनी केले आहे.