Thane Crime : एका डुबकीचा मोह नडला, खदानीत मारली उडी अन् पुन्हा बाहेर आलाच नाही !

| Updated on: Jul 16, 2023 | 1:40 PM

मित्रांसोबत धबधब्यावर पिकनिकला तरुण गेला होता. यावेळी बाजूला असलेल्या खदानीत डुबकी घेण्याचा मोह त्याला आवरला नाही. मात्र हाच मोह त्याला महागाच पडला.

Thane Crime : एका डुबकीचा मोह नडला, खदानीत मारली उडी अन् पुन्हा बाहेर आलाच नाही !
कल्याणमध्ये खदानीत तरुण बुडाला.
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / 16 जुलै 2023 : कल्याण डोंबिवली नजीकच्या ग्रामीण भागात खदानींनी अनेक जणांचे जीव घेतले आहे. आता पुन्हा अशीच एक घटना कल्याण नजीक असलेल्या म्हारळ गावात घडली आहे. अनेकदा तरुण पाण्याच्या ठिकाणी मौजमजेसाठी जातात आणि अति उत्साह दाखवतात. पाण्याचा अंदाज नसल्याने नंतर अनुचित प्रकार घडतात. म्हारळ गावातील खदानीजवळ असलेल्या धबधब्यावर काही मित्र फिरायला गेले होते. यापैकी एकाला खदानीत एक डुबकी घेणं महागात पडलं आहे. खदानीत डुबकी घेताच तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडली आहे. उमेश अंबादास सोनवणे असे मयत तरुणाचे नाव आहे.

मित्रांसोबत खदानीजवळील धबधब्यावर गेला होता

म्हारळ गावातील क्रांतीनगर येथे राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा आपल्या 7 ते 8 मित्रांबरोबर 14 जुलै रोजी म्हारळ हद्दीतील खदानी जवळ असलेल्या धबधब्यावर गेला होता. यावेळी तिथेच खाली असलेल्या खदानमध्ये मी टीशर्ट धुवतो आणि एक डुबकी मारून येतो, असे आपल्या मित्रांना त्याने सांगितले. उमेशने उडी घेतली खरी पण त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला. तो बुडत असताना काही मित्रांनी पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी दोरी फेकली. उमेश एकदा वर आला पण त्यानंतर पाण्यात बुडू लागला. तो पुन्हा वर आलाच नाही.

दुसऱ्या दिवशी स्पीड बोटच्या सहाय्याने मृतदेह काढला

तरूणांपैकी एकालाही पोहता येतं नसल्यामुळे कोणीही पाण्यात उतरले नाही. उल्हासनगर येथे असलेल्या अग्निशामक विभागाला कॉल केला असता ती हद्द आमची नाही असे सांगण्यात आले. बराच वेळाने अग्निशामक दलाने त्या ठिकाणी येऊन शोधण्यासाठी गळ टाकला, पण उमेशचा शोध लागला नाही. यानंतर काल सकाळी सात वाजता कल्याणमधील आधारवाडी अग्निशामक दलाने स्पीड बोटच्या साह्याने उमेशचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले.

उल्हासनगर आणि कल्याण येथील अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर उमेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या परिसरात अनेकदा नागरिक फेरफटका मारायला येत असतात. त्यामुळे खदान परिसरात म्हारळ ग्रामपंचायतीने सूचना फलक लावण्याची गरज आहे.