ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सर्व विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती स्विकृती केंद्रावर शनिवारी (11 सप्टेंबर) दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पृथ्वी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे रक्षण करण्यासाठी ‘हरित शपथ’ घेण्यात आली. दरम्यान नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमात सहभागी होवून ठाणे शहराचा राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे.
राज्य शासनाद्वारे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 2020-21 मध्ये ठाणे महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच या वर्षाकरिता देखील सदर स्पर्धेची घोषणा झालेली आहे ‘माझी वसुंधरा 2’ मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विसर्जन स्थळांवर, गणेशमूर्ती स्विकृती केंद्रांवर येणाऱ्या भाविकांनकडून पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे रक्षण करण्याबाबतची हरित शपथ घेण्यात येत आहे.
कोव्हिड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे निर्गमित केलेल्या गणेशोत्सव नियमावली 2021 चे अनुपालन करुन नागरिकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभतेने करता यावे याकरिता महापालिकेच्यावतीने विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती स्विकृती केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शनिवारी सर्व विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनाकडून माझी वसुंधरा उपक्रमातंर्गत ‘हरित शपथ’ घेण्यात आली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी भक्तीमय वातावरणात पार पडले. यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 8 हजार 979 गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. यापैकी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपट घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या गणेश मुर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 21 गणेश मुर्तींचे तसेच 19 सार्वजिनक गणेश मुर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत 2952 नागरिकांनी बुकिंग करुन प्रत्यक्षस्थळी विसर्जन केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर नरेश गणपत आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा :
पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं
भातसा धरण ओव्हर फ्लो, धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा