ठाणे : अनेक वेळा निवेदने देऊनही मुंब्रा-कौसा भागाची पाणी समस्या (Water Problems) सोडविली जात नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी (NCP)च्या कार्यकर्त्यांनी फरज़ाना शाकिर शेख, मर्ज़िया शानू पठान, शाकिर शेख, साकिब दाते यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन (Protest) केले. दरम्यान, तीन दिवसात ही पाणी समस्या निकाली न निघाल्यास ठामपा मुख्यालयावर हजारो महिला धडक देतील,असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला. येथील पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी अधिकार्यांसह दौरा केला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्या दिसून आल्या. मात्र, त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याने या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम करण्याबाबत अधिकार्यांनी आश्वासित केले होते. मात्र, अद्यापही त्यावर काम सुरु झालेले नाही.
मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहेत. या भागात पाणीपुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, अशा समस्या भेडसावत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी अधिकार्यांसह पाहणीदौरा केला होता. त्यानंतर आयुक्तांशीही चर्चा केली होती. या पाहणी दौर्यानंतर जमिनीखाली दबलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अशक्य असल्याने नवीन जलवाहिन्या टाकण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, कार्यवाही न झाल्याने मर्जिया पठाण यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरही आंदोलन केले होते. मात्र, अनेक महिने उलटल्यानंतरही या समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने सोमवारी दुपारी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाणीपुरवठ्याच्या नूतनीकरणासाठी 238 कोटींचा ठेका दिला आहे. ठेक्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. अनेक महिन्यांपासून पाणी नसल्याने मुंब्रावासियांचे हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे हा संविधानाच्या 21 व्या कलमाचा म्हणजेच मूलभूत अधिकारांचे हनन आहे. त्याविरोधात आपण हे आंदोलन सुरु केले आहे. जर तीन दिवसात ही पाणी समस्या निकाली न निघाल्यास ठामपा मुख्यालयावर हजारो महिला धडक देतील, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला.