ऑफलाईन रेल्वेपास प्रक्रिया सुरु होताच ठाण्याचे पालिका आयुक्त रेल्वे स्टेशनवर, काम कसं सुरुय? सर्व गोष्टींची शाहनिशा

| Updated on: Aug 11, 2021 | 9:41 PM

येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेऊन 15 दिवस पूर्ण झालेले असले पाहिजेत, असा राज्य सरकारचा निर्णय आहे.

ऑफलाईन रेल्वेपास प्रक्रिया सुरु होताच ठाण्याचे पालिका आयुक्त रेल्वे स्टेशनवर, काम कसं सुरुय? सर्व गोष्टींची शाहनिशा
ऑफलाईन रेल्वेपास प्रक्रिया सुरु होताच ठाण्याचे पालिका आयुक्त रेल्वे स्टेशनवर
Follow us on

ठाणे : येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेऊन 15 दिवस पूर्ण झालेले असले पाहिजेत, असा राज्य सरकारचा निर्णय आहे. त्यानुसार आजपासून (11 ऑगस्ट) ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वे स्थानकांवर ठाणे महापालिकेच्यावतीने मदत कक्षाला सुरुवात झाली आहे. त्याद्वारे नागरिकांना आता रेल्वे पास दिला जातोय.

मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश

याच पार्श्वभूमीवर पास देण्याबाबतची काम सुरु आहे, याची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वत: ठाणे स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व कामांची पाहणी करत आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलद गतीने रेल्वे पास मिळण्यासाठी तात्काळ मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, सहाय्यक आयुक्त अलका खैरे, सागर साळुंखे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

ऑफलाईन पडताळणी करुन पास

ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तसेच ओळखपत्राची ऑफलाईन पडताळणी करुन त्याआधारे त्यांना मासिक पास रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वेस्थानकावर मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत.

मदत कक्षाची वेळ

ठाणे महापालिकेच्यावतीने या मदत कक्षात सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा दोन सत्रांमध्ये 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मदत कक्षावरील कर्मचाऱ्यांकडून संबंधित नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राची वैधता कोविन अॅपवर तपासून छायाचित्र ओळखपत्र पुराव्याची देखील पडताळणी करण्यात येत आहे.

या पडताळणीमध्ये कागदपत्रे वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येत आहे. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येत आहे.

नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चारही रेल्वे स्थानकावरील सर्व पडताळणी प्रक्रियेची पाहणी करून आढावा घेतला. या संपूर्ण प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अधिक जलद गतीने रेल्वे पास मिळण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापालिका आयुक्त डॉ.‍ विपीन शर्मा यांनी केले आहे.

महापालिका आयुक्तांचा ठाणे-दिवा रेल्वे प्रवास

ठाणे महापालिकेच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकावर सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाच्या पडताळणी प्रक्रियेची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करुन कळवा-मुंब्रा-दिवा असा लोकल प्रवास केला. यामध्ये प्रत्येक स्थानकांवर सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाला भेट देवून स्वतः कागदपत्रे पडताळणीची खात्री केली. या प्रवासा दरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांसोबत संवाद साधला.

हेही वाचा :

लसीकरणाच्या कूपन्स वाटपात काळाबाजार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप

कल्याणमध्ये 72 वर्षीय आजी रांगेत, 8 तास उभं राहिल्यानं तरुणही कोसळला, तरीही लसीचं कुपन नाहीच