नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी पूर्व परवानगी सक्तीची, गरबा खेळण्यास मनाई; ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

| Updated on: Oct 02, 2021 | 4:01 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ठाणेकरांना नवरात्रौत्सव साधेपणाने आणि कोरोनाचे नियम पाळूनच साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे. (tmc Issues Guidelines for navratri; not allowed to garba program)

नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी पूर्व परवानगी सक्तीची, गरबा खेळण्यास मनाई; ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
navratri
Follow us on

ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ठाणेकरांना नवरात्रौत्सव साधेपणाने आणि कोरोनाचे नियम पाळूनच साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे. तसेच नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी उत्सव मंडळांना महापालिकेची पूर्व परवानगी घेणेही बंधनकारक करण्यात आलं असून गरबा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी उत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे. कोविड -19 या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि ठाणे महानगरपालिकेचे या संबंधीचे धोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवीमूर्तीची सजावट आटोपशीर असावी. तसेच देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती मूर्तीकरिता 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. जेणेकरुन आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळावे. घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

फक्त 5 जणांना परवानगी

घरगुती देवीमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या स्वरुपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त 5 व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील ते मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत. सामाजिक अंतर पाळावे. तसेच शक्यतोवर या व्यक्तींनी कोविड -19 या रोगाच्या लसीकरणचे 2 डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क, शिल्ड इ. स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे, असं या नियमावलीत नमूद केले आहे.

गरब्याचे आयोजन करू नका

नवरात्रौत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. यासोबतच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन दर्शन घ्या

गरबा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे. तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवी मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर, सॅनीटायझर इत्यादी स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जतुकीकरण करावे. तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे, असं पालिकेने म्हटलं आहे.

प्रसाद वाटप करू नका

नवरात्रौत्सव साजरा करतेवेळी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना पसंती देण्यात यावी. शक्यतो व्यावसायिक जाहिराती करु नयेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे आदी बाबींस शक्यतो आळा घालावा. नवरात्रौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद आदी विक्रीसाठी स्टॉल, दुकाने लावू नयेत.

रोषणाई, देखावे करू नका

कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट, रोषणाई तसेच देखावे करु नयेत. नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक, भक्तीपर आदी गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. तसेच उपस्थित सर्व व्यक्तिंनी मास्क लावणे बंधनकारक आहे. यासोबतच सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे हे पाहण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची राहील. देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत, त्यांनी मास्क आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

विसर्जन मिरवणुका टाळा

देवीच्या विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जन स्थळी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडणे आवश्यक राहील. लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्तीचे एकत्रितरित्या विसर्जनास नेऊन गर्दी करण्यास परवानगी असणार नाही, असंही नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे.

महापालिका विसर्जन करणार

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये. तर वाहनातील देवीमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेवून जावे. विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास, पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळी देवीमूर्तीचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. विसर्जनस्थळी मूर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी तेथे मूर्त्या जमा कराव्यात व त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं.

तर मंडपातच विसर्जन करा

ठाणे महापालिकेच्यावतीने नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटर, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी आवश्यकतेनुसार दरवर्षी केली जाणारी व्यवस्था चोखपणे करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. मास्क, सोशल संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नवरात्रौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मूर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहणार आहे, असंल पालिकेने म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

ठाणे बनले ‘स्मार्ट सिटी’, 1500 सीसीटीव्हींमुळे सोनसाखळी चोरी, वाहनचोरींना लगाम!

बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोऱ्हे डोंबिवलीत, पोलिसांनाही महत्त्वपूर्ण सूचना

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

(tmc Issues Guidelines for navratri; not allowed to garba program)