ठाणे (गिरीश गायकवाड) : मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत. उद्धव ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्र्यात आणि मुलुंड टोलनाक्यावर हे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. आता यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका रंगली आहे. उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडता, तुमची लायकी काय आहे? असं संजय राऊत यांनी विचारलय. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तर दिलय.
“संजय राऊत तुमची लायकी काय ? हे महाराष्ट्राला माहित आहे. सिलवर ओकच्या बाहेरील द्वारपाल. सिलवर ओकचा पगारी नोकर ही त्यांची स्वत:ची लायकी आहे” अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी घणाघाती टीका केलीय. बॅनर फाडण्याची आम्हाला गरज नाहीय असं म्हस्के म्हणाले. “राज्यात जातीय दंगली घडवण्याचा जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांचा कट आहे. मुंब्र्याच्या शाखेमध्ये लोक आणण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी 500- 500 रुपये वाटलेले आहेत” असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला. “राज्यात जातीय दंगली घडवण्याचा कट आखला जातोय. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत. संजय राऊत यांनी वर्षा बाहेर चाकरी करावी. मुख्यमंत्री शिंदे काही जाणार नाहीत. ते टर्म पूर्ण करणार” असं म्हस्के म्हणाले.
‘हेच मुळात अफजल खानाची औलाद’
“हेच मुळात अफजल खानाची औलाद आहेत. यांची काय लायकी आहे ते सांगा ना. आम्ही खरी शिवसेना आहोत” असा दावा नरेश म्हस्के यांनी केला. “मुंब्रा शाखेवर आमचा दावा कायम राहणार, ती शाखा आनंद दिघे यांनी बांधलीये, तिथले शाखा प्रमुख उद्धवराव जगताप हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि उबाठा गट तिथे ड्रामा करतोय. आम्ही त्यांना घाबरत नाही. तिथे आमची ताकद आहे. पोलिसांनी पाहावं त्यांना काय करायचंय ते” असं नरेश म्हस्के म्हणाले. “संजय राऊत यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांनी आयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली, एकनाथ शिंदे यांचे कान भरले. कारण त्याला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं होतं” असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.