उल्हासनगर : थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला पोलीस आणि महापालिकेकडून उल्हासनगरात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारण उल्हासनगरचा कुप्रसिद्ध असा चांदनी डान्स बार अखेर सील करण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेनं ही मोठी कारवाई केली आहे. उल्हासनगरच्या सेक्टर 17 परिसरात चांदनी नावाचा हा डान्स बार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. कोरोनाच्या काळातही सरकारी नियम न पाळता बिनधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरू होती. या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकली होती आणि येथे सुरु असलेल्या अश्लील नृत्याचा भांडाफोड केला होता.
इतकंच नव्हे, तर आजवर या डान्स बारवर तब्बल 80 वेळा पोलीस आणि महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या. या बारमध्ये बिनदिक्कतपणे छमछम सुरु होती. त्यामुळे मध्यवर्ती पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना 6 डिसेंबर रोजी पाठवला होता. त्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या पथकानं ऐन थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येलाच या बारला सील ठोकलं आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या डान्सबार लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर शहरात एकूण 12 ते 15 डान्सबार आहेत. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त डान्सबार हे एकट्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी ही बाब मान्य करत नव्हते. त्यामुळे शेवटी चांदनी बारवरील कारवाई का केली? याची कारणं याच अधिकाऱ्यांना उत्तर मिळण्यासाठी पुरेशी ठरतील.
दरम्यान, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हॉटेल्स्, उपहारगृहे यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या हॉटेल, उपहारगृहांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (Ulhasnagar’s Chandni Dance Bar finally sealed, So far, action has been taken 80 times)
इतर बातम्या
Delhi Crime: बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; भर बाजारात केले वार
Uttar Pradesh: कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार