ठाणे : शिक्षण व नोकरीनिमित्त परदेशात जाणाऱ्या नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने कौसा आरोग्य लसीकरण केंद्रात शनिवारपासून (26 जून) ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण (Walk in vaccination) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (‘Walk in’ vaccination facility in Thane for citizens going abroad)
परदेशी जाणाऱ्या नागरिकांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्या पोस्ट कोव्हिड सेंटरसोबत आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला असून उद्या दिनांक 26 जूनपासून कौसा आरोग्य केंद्रात परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
सध्या परदेशात जात असताना लस घेणे बंधनकारक करण्यात आले असून ठाणे महापालिका क्षेत्रातील शिक्षण, नोकरी व तातडीच्या कामानिमित्त परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी कौसा आरोग्य लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लस देण्यात येणार आहे. तरी परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेची (Vaccination Drive) व्यापकता वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आणि रेमंड कंपनी यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणीकृत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरणाचा शुभारंभ आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाच्या व्यापकता वाढावी यासाठी रेमंड कंपनी येथे आजपासून ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुरु करण्यात आले असून आज पहिल्याच दिवशी 300 कोव्हीशील्डचे डोस देण्यात आले.
‘ड्राईव्ह ईन’ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरीकांनाच लस देण्यात येत आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर सकाळी 11 ते 4 या वेळेत लसीकरण सुरु राहणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Corona Vaccination | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे Walk In लसीकरण
(‘Walk in’ vaccination facility in Thane for citizens going abroad)