ठाणे : मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे आदी घटना घडू शकतात. याबाबत करावयाच्या उपाययोजनाचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली (Weather Alert Heavy rainfall in Thane).
1) शहरात ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्याठिकाणी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी सबमर्शीबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या काळात प्रभाग समिती स्तरिय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या (Weather Alert Heavy rainfall in Thane).
2) शहरात रस्त्यावर झाडे पडल्यास ती तात्काळ हटविण्यासाठी मशिनरी आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यास, भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे त्या-त्या प्रभाग समितीमधील महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती निवारा केंद्रे निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.
3) या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी टीडीआरएफच्या तीन टीम तयार ठेवावी. तसेच एनडीआरएफ आणि आवश्यकता भासल्यास आर्मीच्या पथकाशी समन्वय साधावा असे सांगितले.
4) शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करावी. तसेच धोकादायक स्थितीतील जाहिरात फलक त्वरीत हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.
हेही वाचा : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश