मुंबई – महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे भरीव योगदान आहे. राज्यातील विविध व्यवसायाला सहकाराची जोड मिळाल्याने ते व्यवसाय भरभराटीस आल्याचे प्रतिपाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते वैकुंटभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, राज्याच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ही बँक स्थापन करण्यामध्ये वैकुंटभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी आणि प्रा. धनंजय गाडगीळ यांची भूमिका महत्त्वाची होती. सहाकार क्षेत्रामुळे राज्याचा झालेला कायापालट आपण सर्वांनीच अनुभवला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान केवळ 10 ते 12 टक्के आहे. जोपर्यंत कृषी क्षेत्राला सहकाराची जोड मिळत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्राचा विकास होणे शक्य नसल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितला, मी सोलापूरवरून कराडला जात होतो. तेव्हा पाटबंधारे विभागातील काही अभियंते माझ्यासोबत होते. या भागात जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. मात्र तरी देखील मी गाडीतूनच त्या अभियंत्यांना सांगायचो की, या भागात पाणी पोहोचले आहे. या भागामध्ये पाणी पोहोचले नाही. हा भाग दुष्काळी आहे. जेव्हा ते गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांनी मला एक प्रश्न केला. तुम्ही तर या भागामध्ये पहिल्यांदाच आला आहात मगा तुम्ही सर्व अचूक कसे ओळखले. तेव्हा मी त्यांना म्हणालो सोपे आहे. ज्या-भागाचा विकास झाला आहे, त्याचाच अर्थ तिथे पाणी पोहोचले आहे. आणि जो भाग मला ओसाड वाटला तिथे पाणी पोहोचले नसल्याचे मी सांगितले.
गडकरी पुढे म्हणाले की, केवळ पाण्यानेच प्रश्न सुटत नाही, तर त्याला सहकाराची देखील जोड हवी असते. हे सांगण्यासाठी त्यांनी कोल्हापूरचे उदाहारण दिले. कोल्हापूर प्रमाणेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. मात्र कोल्हापूर हा देशातील सर्वात जास्त जीडीपी असलेला जिल्हा आहे. तर पाणी असून देखील विदर्भातील काही जिल्ह्यांचा विकास झाला नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये सहकाराला फार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्याची फळे आता दिसत असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
संबंधित बातम्या