सिंधुदुर्ग : कोकणातील पहिली बैलगाडी शर्यत आज वैभववाडी येथे होत असून सर्वांना त्याची उत्सुकता लागली आहे. या बैलगाडी शर्यतीला माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. या ठिकाणी कालपासूनच स्पर्धक बैलगाड्या हजर झाल्या आहेत. वैभववाडी-नाधवडे माळरानावर या बैलगाडींचा थरार अनुभवायला मिळणार आहे. शासनाच्या 27 अटी व शर्थीचें पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम सर्वांसाठी बंधनकारक असणार आहेत. या बैलगाडी शर्यतीसाठी रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, बेळगाव, डोंबिवली व सिंधुदुर्गातील बैलजोड्यानी नाव नोंदणी केली असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 बैलजोड्या सद्यस्थितीत उपस्थितत झाल्या आहेत.
नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळाल्यानंतर कोकणात प्रथमच बैलगाडी शर्यत होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून विनामास्क असणाऱ्यांना प्रवेश ठनाकारला जात आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. कुठल्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. नियमांचे काटकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
नियम मोडल्यास कारवाई होणार
याआधीही नाशिक आणि पुण्यात नियम मोड शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नाशिक पोलिसांनी शर्यत आयोजकांसह इतर काही जणांवर गुन्हे दाखल केले आहे, राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे, अशात ही शर्यत पार पडत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे, त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे पालन होणेही गरजचे आहे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.