मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आमदार, खासदार यांनी काम केले नाही तर त्यांची तिकिटे कापली जाणार असे सांगितले. याचाच अर्थ खासदारांची कामगिरी सुमार आहे याची जाहीर कबुलीच भारतीय जनता पार्टीने दिली एक प्रकारची कबुली दिली अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ( शरद पवार गट) प्रवक्त्यांनी केलीय. तर, पक्षातील कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेऊन पक्ष बांधणीसाठी राज्यात शरद संपर्क अभियान सुरु करण्यात येणार आहे. याची सुरुवात कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातून होणार आहे. येत्या 30 तारखेपासून मुरबाड तालुक्यातून हे अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे अपात्रेतेची सुनावणी सुरु आहे. 13 ऑक्टोबरपर्यत पुढील सुनावणी होणार आहे. कदाचित त्याचवेळी निकाल अपेक्षित आहे. भारतीय संविधानावर आमचा विश्वास आहे. दहाव्या सूचीच्या अनुषंगाने सकारात्मक अध्यक्ष यांनी घेतला तर पुढच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला दुसराच मुख्यमंत्री बसलेला दिसेल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
अजितदादा पुरोगामी विचाराचे नेते आहेत. अजितदादांची कारकीर्द आम्ही फार जवळून पाहिली आहे. पण, प्रथमच त्यांच्या कार्यकर्त्यांना इतके हताश होण्याची वेळ पाहिली. अजित दादा नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री झाले असते. भारतीय जनता पार्टी त्यांना मुख्यमंत्री बनू देईल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपला स्वतःसोबत घ्यायचे होते. त्यांचा उद्दिष्ट साध्य झाला पण, मतांची टक्केवारी ही भाजपच्या बाजूला गेली नाही असे ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ४८ जागा लढविणार असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढविणार आहोत. त्यातील काही जागा या ठाकरे गटाला मिळतील. प्रकाश आंबेडकर यांची अधिकृत अलायन्स ही ठाकरे गटासोबत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या याचा निर्णय उद्धव साहेबच घेतील. याचे अधिकृत उत्तर तेच देतील असेही तपासे म्हणाले.