कल्याण : 15 ऑक्टोबर 2023 | कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आणि डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिले होते. आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित डोंबिवलीत बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरमध्ये राजू पाटील यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शुभेछ्या दिल्या. तसेच, तुमच्यापुढे माजी लागणार नाही याची काळजी घ्या असा सुचक इशाराही दिला होता.
मनसे आमदार राजू पाटील यांनी या इशाऱ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ‘बापाने पॉकेट मनी म्हणून MMRDA, MSRDC चा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता करताहेत. कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या अशी खरमरीत टीका केली होती. आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील वादामध्ये श्रीकांत शिंदे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मोठा धक्का दिला.
टेंभी नाका येथील देवी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केली. पुढच्या दोन वर्षांनी याला पन्नास वर्षे पूर्ण होतील. या देवीच्या दर्शनासाठी श्रीकांत शिंदे आले होते यावेळी त्यांनी उद्धव ठकारे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. ज्या अर्थी ते समाजवादी पक्ष आणि सगळ्यांना एकत्र येऊन घेत आहेत ही त्यांची मजबुरी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले त्यामुळे अशी वेळ त्यांच्यावर आली आहे. भविष्यामध्ये देखील त्यांना त्यांचाच सहारा घेऊन जावे लागेल. हिंदुत्वच्या नावाने राजकारण करत होते आणि आता सेक्युलर पक्षांना घेऊन ते राजकारण करताहेत यापेक्षा दुर्दैव असू शकतं का? अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांनाही शह दिला. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके, महिला विभाग शहर अध्यक्ष शितल लोके यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षात आणले. मुख्य म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे वकील आणि जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास तेलंग हे ही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गटात प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. मनसे आमदार राजीव पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला दिलेल्या आव्हानानंतर शिवसेनेने मनसेला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले अशी चर्चा आता रंगली आहे.