मुंबई : MPSC परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे, परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे याआधीही अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत, राज्यात सध्या ओमिक्रॉनचा वेगान फैलाव होत आहे, त्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक होत आहेत. ओमिक्रनला रोखण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे, अशातच वय वाढलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना संधी मिळावी, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगाचे ट्विट काय?
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार
परीक्षा लांबणीवर टाकताना, परीक्षाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. कोरोना महामारीत शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. या उमेदवारांची शासकीय सेवेची दारंदेखील बंद झाली होती. पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगानं एक पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे. 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना 27 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येऊ शकेल. या अर्जांसाठीचं ऑनलाईन शुल्कहे देखील 31 डिसेंबरपर्यंत भरावं लागणार आहे. तर एसबीआयमध्ये चलनाद्वारे शुल्क भरायचं झाल्यास चलनाची प्रत 1 जानेवारीपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर 3 जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क करण्यास मुदत देण्यात आली आहे.