योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : दिवाळीनिमित्ताने (Diwali Festival) गेल्या दहावर्षापासून दादर येथील शिवाजी पार्क (shivaji Park) येथे मनसेच्या (MNS) वतीने दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी हा दीपोत्सव खास ठरला आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसे यांची जवळीक वाढत चालली आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत चालली आहे. एकूणच यानिमित्ताने महायुतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब होते याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर कधीकाळी मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या रूपाली पाटील यांनी भाजप आणि मनसेला खुलं आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हंटलंय, भाजप आणि मनसेत युती आहे का ? छुपी युती असेल तरी जगजाहीर करा आणि युती झाली नसेल तरी जगजाहीर करा.
याशिवाय पाटील यांनी मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही एकत्रित आले आहात का ? तुमची युती झाली असेल तर ती जाहीर करा कर छुपी युती करून नंतर म्हणू नका युती नव्हतीच असेही म्हंटले आहे.
दिवाळीच्या कार्यक्रमात कोणी कुठेही जाऊ शकतं मात्र मनसेच्या सुख दुखात तुम्ही जात आहात यासाठी आमच्या सदिच्छा असल्याचे देखील रूपाली पाटील यांनी म्हंटले आहे.
छुप्या युती करून कटकारस्थान करू नका, राजकारण खराब करू नका असे म्हणत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेच्या समस्येवर प्रकाश टाकावा असे म्हणत पाटील यांनी कोपरखळी लागावली आहे.
खरंतर रूपाली पाटील यांनी मनसेमध्ये असतांना आक्रमक भाषेत अनेकदा भाजपवर टीका केली आहे, मात्र आता राष्ट्रवादी गेलेल्या पाटील यांनी अत्यंत संयमाने प्रतिक्रिया देत टीका केल्याचे दिसून येत आहे.
मात्र, खरंच भाजप आणि मनसेत खरचं युती झाली आहे का ? छुपी युती आहे का ? अशी चर्चा देखील राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे.