पंढरपूरः पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वारकऱ्यांचं कौतुक केलंय. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला.
ते म्हणाले की, नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतला आहात, आपण काही राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. साहजिकच आहे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेली अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस, रस्त्यातील काटे खळगे यांचा विचार न करता आपली परंपरा जोपासणारे आपले वारकरी, त्याच्यातले अनेक साधूसंत यांच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे दूर करणं हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी कोणत्याही पावलावर राहून देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत राहू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलंय.
या वारीचं दर्शन मी स्वतः घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी वारीची फोटोग्राफी मी हेलिकॉप्टरमधून केलेली आहे. ते विराट दर्शन मी त्यावेळी पाहिलं, डोळ्यामध्येच मावत नाही, तर कॅमेऱ्याचं सोडाच. अनेक ठिकाणांहून पालख्या येत असतात, या पालख्या म्हणजे जणू काही नद्या सागराकडे वाहत आहेत, असंच ते दृश्य असतं, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
शेवटचं मोठं रिंगण असतं ते वाखरीचं, नितीनजी ही गोष्ट अत्यंत चांगली केलीत. वाखरी ते पंढरपूर हा महामार्गसुद्धा मोठा करण्याचा निर्णय घेतलात. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण सगळ्या नद्या तिकडे येतात आणि तिकडे मोठा भक्तिसागर होतो. भक्तिसागरऐवजी दुसरा शब्द मला तरी सूचत नाही. या पालखीचा थोडा अनुभव मी पायीसुद्धा घेतलेला आहे. आपण वेगळ्या दुनियेत राहतो, पण हा वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेलेला आहे. त्यांच्याबरोबर थोडा चालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देहभान हरपून म्हणजे काय याचा प्रत्यय तिकडे येतो. पाण्याला खळखळाट असतो, पण या भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद असतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
जोपर्यंत आपण त्याच्यात असतो, आपणही देहभान हरपून जातो. रस्ते तर चांगले असेलच पाहिजे, पण त्या मार्गावरून आपल्या देशानं आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. ही वाटचाल पुढे सहजतेने व्हावी, याच्यासाठी आज आपण पुढाकार घेतला. त्याबद्दल खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत आपल्याला वारकरी संप्रदायानं खूप काही दिलेलं आहे. दिशा, संस्कार आणि संस्कृती तर दिलेलीच आहे. गेली अनेक शतकं परकीय आक्रमणं झेलून या वारकरी सांप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. जे आयुष्यभर पंढरीची वारी करत असतात, त्यांचं मार्गदर्शन लाभणं हे आपलं भाग्य आहे. मोदीजी मी तुम्हाला धन्यवाद देतो, हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, विठूमाऊलीही आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र कोणत्याही पावलावर मागे राहणार नसल्याचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय.
संबंधित बातम्या:
औरंगाबादः सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
गर्लफ्रेण्डशी झालेली मैत्री खटकली, दारु प्यायला बोलावून मित्राचाच काटा काढला