मुंबई : अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आल्यानंतर मंत्रीपदासाठी मुंबईत गोंधळ आणि दिल्लीत फैसला असं सर्व सुरु झालं आहे. यात इच्छुक आमदारांची मंत्रिपदासाठी धाकधूक लागली आहे, आपण आमदार झालो, आता एकदा तरी आयुष्य़ात मंत्री व्हायला पाहिजे, ही आतल्या आतली ती इच्छा पुन्हा जागृत झाली आहे. काही महिन्यांपासून काही जण वेटिंगमध्ये आहेत, तर काहींना अचानक मंत्रिपदाचा लाभ होण्याची शक्यता आहे. आपलं नाव कधी येणार या तीन पक्षांच्या इच्छुकांच्या गर्दीत आपलंही नाव मंत्रिपदी कसं येणार, येईल की येणार नाही, कोण दिल्लीला गेले, कोण काय बोलले, कुणाचं काहीही होवो, पण आपल्याला तर मिळणारच मिळणार, यासर्व घडामोंडींवर भावी मंत्रीसाहेबांच्या परिवारासह कार्यकर्त्यांचे कान आता लागून आहेत.
यात नितिन गडकरी यांनी सांगितलेला किस्सा आता सर्वांना पुन्हा आठवतोय. महाराष्ट्राचं नाव न घेता त्यांनी हा किस्सा सांगितला होता, नितीन गडकरी म्हणाले होते, “एवढी गर्दी झाली, मंत्रिपदासाठी शिवलेल्या त्या सुटाबुटाचं काय?, आपला मंत्रिपदाचा चान्स येणार की नाही, आता या सुटाचं काय करायचं हा प्रश्न आहे”
तसेच “आमदाराला वाटतं मी मंत्री का झालो नाही, मंत्र्याला वाटतं आपण मुख्यमंत्री का झालो नाही, अशी सर्वांची इच्छा असते, या इच्छांमुळे सर्व दु:खी आत्म्यांची संख्या राजकारणात वाढली आहे, पण, सर्वांनी जर विचार केला की आपल्याला आपली हैसियत आणि लायकीपेक्षा किती तरी जास्त मिळालं आहे, असा सर्वांनी विचार केला तर सर्व सुखी होतील”, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका भाषणात म्हटलं होतं,
नितिन गडकरी यांनी सांगितली तशीच परिस्थिती सध्या राज्याची झाली आहे. नितिन गडकरी यांनी याआधीही हा किस्सा सांगितला आहे. नितिन गडकरी या भाषणात पुढे बोलताना म्हणाले होते, मी ज्या हॉलमध्ये भाषण करतोय, यात २२०० जणं बसू शकतात, या हॉलमध्ये लोकांची संख्या वाढवता येऊ शकते, पण मंत्रिमंडळाची हवी तेवढी क्षमता वाढवता येत नाही.
नितिन गडकरी यांनी जे सांगितलं ते सत्य आहे, पण, हे सत्य बोलून दाखवण्याची हिंमत नितिन गडकरी यांनी करुन दाखवली आहे. सध्या महाराष्ट्रात हेच सुरु आहे, अजित पवार हे पाचव्या वेळेस उपमुख्यमंत्री झाले, आपल्या पक्षाच्या गटाच्या बैठकीत अजित पवार बोलून गेले, “माझा मुलगा मला म्हणतो, पापा तुम्ही आणखी किती वेळेस उपमुख्यमंत्री होणार?” खरं तर कुणाला तरी मंत्रिपद मिळणार आहे, कुणाचं तरी जाणार आहे, कोणत्या तरी आमदाराला आमदारकीवरच भागवावं लागणार आहे.