कल्याण : 4 ऑक्टोबर 2023 | कल्याण लोकसभेत खासदार म्हणून मनसे आमदार इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून उल्हासनगरमध्ये भावी खासदार असे मनसे आमदारांचे बॅनर लागले होते. मनसे आमदार राजू पाटील यांनी दिवा येथे भावी खासदार असा लिहीलेला केकही कापला होता. यावेळी मदार राजू पाटील यांनी मनसेकडून आम्ही खासदारकीच्या निवडणुकीला सज्ज आहोत. पक्षाकडून तयारी केली जात आहे असं स्पष्ट केलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावरून आमदार राजू पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्याचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ असे सांगत आजीच्या पुढे माजी लागू नये असा इशारा दिला होता.
आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केलाय. आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता एक “नाथ” आहे घरी म्हणून ही मुजोरी ?… असे ट्विट केलंय.
माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील ‘त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. मी ही कोणाचं नाव घेतलं नाही. काही लोकांना पॉकेट मनी मिळावा म्हणून घरच्या खात्यातून काम दिली आहेत. त्यामुळे ते काम आणि वल्गना करत आहेत, असा टोला लगावलाय.
आम्ही छोटी काम केली त्याला छोटं का रेटता? कुठलंही काम छोटे नसतं. गल्लीतलं काम केलं तरी ते लोकांच्या सोयीसाठी असतं. बिल्डरसाठी रस्ते बांधले तरी ते लोकांच्या सोयीसाठी असते. त्यामुळे त्यांच्यातला थोडा माज दिसत होता ते उतरवण्यासाठी मी हे ट्विट केले असे त्यांनी सांगितले.
बापाने पॉकेट मनी म्हणून MMRDA, MSRDC, चा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता? कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या, रेल्वे प्रवाश्यांना रोज मरण यातना भोगाव्या लागल्या नसत्या. एक “नाथ” आहे घरी म्हणून ही मुजोरी ?…