मुंबई: टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ममतादीदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यानंतर पवार आणि ममतादीदींनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना यूपीए संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर कुठे आहे यूपीए? आहे कुठे यूपीए? असा उरफाटा सवाल ममता बॅनर्जींनी करून सर्वांना धक्का दिला. ममतादीदींनी थेट यूपीएचं असित्वच नाकारलं. त्यामुळे ममतादीदींना काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ममता बॅनर्जी यांनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही होते. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोघेही मीडियाला सामोरे गेले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात सबळ आणि सक्षम पर्याय देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं. शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल ममता बॅनर्जी यांना करण्यात आला. त्यावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.
मी मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठकारेंना भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने त्यांना भेटता आले नाही. त्यांची तब्येत बरी व्हावी ही प्रार्थना करते. उद्धव ठाकरेंऐवजी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंशी माझी चर्चा झाली, असं त्या म्हणाल्या. आज देशात फॅसिझम सुरू आहे. त्या विरोधात एक सक्षम पर्यायी फोर्स असायला हवी. एकटा कोणी हे काम करू शकत नाही. जे स्ट्राँग नेते आहेत त्यांना हे करावं लागेल. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चा करण्यासाठी मी पवारांकडे आले आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच पवारांनी जे काही सांगितलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, असंही त्या म्हणाल्या.
एक स्ट्राँग पर्याय असला पाहिजे. लढणारा पर्याय पाहिजे. जो लढतच नाही त्याला आम्ही काय करणार? सर्वांनी लढावं अशी आमची इच्छा आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला टोला लगावला.
संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विरोधकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीवर ममता बॅनर्जींच्या टीएमसीने बहिष्कार टाकला. त्यानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीतही होत्या. पण या भेटीत त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेणं टाळलं. त्यानंतर त्यांनी आज थेट यूपीएचचं अस्तिव नाकारल्याने ममता बॅनर्जी या काँग्रेसचं नेतृत्वच नाकारत आहेत का? अशी चर्चा जोर धरत आहे.
संबंधित बातम्या:
ममतांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पवारांनी जे सांगितलं त्यानं काँग्रेसची चिंता वाढणार?
हम महाराष्ट्र में नही आ रहे है; ममता बॅनर्जींचा नेमका प्लान काय?
राज्य सरकाचा मोठा निर्णय, आंतरराज्यीय विमानप्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक