वायनाडमध्ये हाहा:कार, भारतीय सैन्याचं अहोरात्र बचावकार्य, चिमुकल्याचं डोळ्यांमध्ये पाणी आणणारं पत्र

| Updated on: Aug 04, 2024 | 4:52 PM

वायनाडमध्ये भलंमोठं संकट कोसळलं आहे. या संकट काळात भारतीय सैन्याकडून जे काम केलं जात आहे ते खूप कौतुकास्पद आहे. भारतीय सैन्याकडून 24 तास बचावकार्य सुरु आहे. भारतीय सैन्याच्या या कामामुळे वायनाडचा एक इयत्ता तिसरी इयत्तेत शिक्षण घेणारा चिमुकला प्रभावित झालाय. त्याने भारतीय सैन्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

वायनाडमध्ये हाहा:कार, भारतीय सैन्याचं अहोरात्र बचावकार्य, चिमुकल्याचं डोळ्यांमध्ये पाणी आणणारं पत्र
वायनाडमध्ये हाहा:कार, भारतीय सैन्याचं अहोरात्र बचावकार्य, चिमुकल्याचं डोळ्यांमध्ये पाणी आणणारं पत्र
Follow us on

केरळच्या वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेमुळे मोठी हानी झाली आहे. या घटनेत शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. या कठीण काळात भारतीय सैन्य दल दिवस-रात्र काम करत आहे. भारतीय सैन्याकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जातोय. पण ढिगाऱ्याकडून जिवंत माणसं नाहीत तर मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. भारतीय सैन्याकडून घटना घडल्यापासून बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. वायनाड येथील सध्याची परिस्थिती हृदय हेलावणारी आहे. तरीही काही जणांचा जीव वाचवण्यात भारतीय सैन्याला यश मिळत आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्याचे जवान जीवाची पर्वा न करता बचावाचं कार्य करत आहेत. सैन्याने इथे युद्ध पातळीवर एक लोखंडाचा ब्रीज उभा केला आहे. भारतीय सैन्याच्या या कामाने एक इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणारा चिमुकला प्रभावित झाला आहे. त्याने भारतीय सैन्याला पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हारल झालं आहे. या पत्राला आता भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भारतीय सैन्याकडून आपल्या अधिकृत (X) अकाउंटवर ट्विट करुन चिमुकल्याच्या पत्राला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

आपल्यावर भलंमोठं संकट कोसळलं आणि या संकट काळात आपल्याला मदत करणारी व्यक्ती ही फार मोठी असते. त्यामुळे अशा व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. पण अनेकांना ते जमत नाही. पण केरळमधील इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या रेयानला ते जमलं. त्याने केरळच्या वायनाड येथे अनेकांचा प्राण वाचवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांचे आभार मानणारे पत्र लिहिलं आहे. या पत्राची दखल खुद्द भारतीय सैन्याकडून घेण्यात आली आहे.

रेयान पत्रात नेमकं काय म्हणाला?

“डियर इंडियन आर्मी, माझ्या प्रिय वायनाडमध्ये भूस्खलनाने मोठं नुकसान केलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करताना आपल्याला पाहून मला खूप गर्व आणि आनंद होतोय. मी आपला तो व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये आपण आपली भूक मिटवण्यासाठी बिस्कीट खात आहात. आणि पुलाचं काम करत आहात. मला या दृश्याने खूप प्रभावित आणि प्रेरित केलं. मी सुद्धा एकेदिवशी भारतीय सैन्यात सहभागी होऊन आपल्या देशाचं रक्षण करणार”, असं रेयान याने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

भारतीय सैन्याने काय म्हटलं?

भारतीय सैन्याने रेयानच्या पत्राला प्रत्युत्तर देत त्याचं कौतुक केलं. “डियर रेयान, तुमच्या हृदयातून निघालेल्या शब्दांनी आमच्या मनाला स्पर्श केला आहे. आपत्तीच्या वेळी आशेचा किरण बनणं हे आमचं लक्ष्य असतं. आपलं हे पत्र आमच्या मिशनची पुष्टी करत आहे. आपल्यासारखे हिरो आम्हाला आपलं सर्वश्रेष्ठ देण्यासाठी प्रेरणा देतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत ज्यादिवशी तुम्ही भारतीय सैन्याची वर्दी परिधान करुन आमच्यासोबत उभे राहणार. आपण एकत्र येऊन आपल्या देशासाठी काम करु. युवा योद्धा, आपल्या प्रेम आणि प्रेरणेसाठी धन्यवाद”, असं भारतीय सैन्याने रेयानला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.