महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक असं यश आलं आहे. त्यामुळे महायुती यावेळी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा करण्याच्या तयारीत आहे. येत्या 5 डिसेंबरला म्हणजेच पुढच्या दोन दिवसांनीच मुंबईतील आझाद मैदानात नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी भाजपकडून प्रचंड तयारी सुरु आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातही वेगवान हालचाली सुरु आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. शपथविधीच्या या ग्रँड महोत्सवात केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळ्याचं देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाकुणाला शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
शपथविधी संदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येत्या 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सत्यनारायण चौधरी, आमदार प्रसाद लाड आणि मोहीत कंबोज उपस्थित होते.