कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. शिवाय कथाकथन, परिचर्चा आदी कार्यक्रम रंगणार आहेत.
प्रकट मुलाखत
सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम (सौमित्र), सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी या कवींसमवेत विश्वाधार देशमुख आणि गोविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.
परिचर्चा
दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत.
कथाकथन
दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे.
परिसंवाद
सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, डॉ. हंसराज जाधव, दीपक करंजीकर, डॉ. राहुल रनाळकर हे वक्ते म्हणून असतील. सायंकाळी गोदातिरीच्या संतांचे योगदानः रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादामध्ये धनश्री लेले, प्रा. विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, डॉ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थॉमस डाबरे, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.
कविकट्टा
संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयोजन केले असून हा कविकट्टा सलग 2 रात्री सुरू राहणार आहे. याचे संयोजन राजन लाखे, संदीप देशपांडे आणि संतोष वाटपाडे हे करणार आहेत. महाराष्ट्रातील 700 कवी आपापल्या रचना सादर करणार आहेत.
बाल साहित्य मेळावा
साहित्य संमेलनाला जोडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा होत आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये सर्वश्री सूर्यकांत मालुसरे, प्रा. पृथ्वीराज तौर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद सिंदकर, किरण भावसार, विद्या सुर्वे, संदीप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम व संतोष हुदलीकर यांचा सहभाग असेल.
कला प्रदर्शन
संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयोजित केले आहे. सोबतच कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
इतर बातम्याः