ही सुरुवात आहे, अनेक धक्के बसतील; शरद पवारांचा भाजपला इशारा

| Updated on: Oct 04, 2024 | 10:47 PM

हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणाही केली आणि पुढच्या काही तासांतच शरद पवारांनी भाजपला इशारा दिला आहे. ही सुरुवात आहे, अनेक धक्के बसतील असं पवार म्हणाले आहेत.

ही सुरुवात आहे, अनेक धक्के बसतील; शरद पवारांचा भाजपला इशारा
Follow us on

हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आणि ही सुरुवात आहे. यापुढेही यापुढेही भाजपला अनेक धक्के बसतील असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी भाजपला 2 झटके दिले आहेत. कागलमध्ये समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनीही तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. वडगाव शेरीचे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंनीही पवारांचा हात पकडलाय. चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटीलही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. अकोलेत मधुकरराव पिचड आणि वैभव पिचडही शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा आहे.

ज्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सीट जाणार, त्या मतदारसंघाचे भाजपचे इच्छुक नेते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे आणि तशी सुरुवातही झाल्याचं दिसतं आहे.

भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, हर्षवर्धन पाटलांनी आधी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि नंतर पत्रकार परिषदेत तुतारी हाती घेणार असल्याचं पाटलांनी जाहीर केलं. 6 किंवा 7 तारखेला इंदापुरात कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे..मात्र भाजपला सोडण्याचा निर्णय फडणवीसांशी बोलूनच घेतल्याचंही हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीआधी हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपात आले होते..त्यामुळं त्यावेळी अवघ्या 3100 मतांनी राष्ट्रवादीच्या दत्ता मामा भरणेंकडून पराभव झाला…आता तेच भरणे मामा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असून त्यांच्याशीच हर्षवर्धन पाटलांचा दुसऱ्यांदा सामना होईल.

आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडून शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानं 2 वर्षांआधीचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय…ज्यात भाजपात आल्यानं शांत झोप लागते…चौकशी बिवकशी काही नाही, असं हर्षवर्धन म्हणाले होते..त्यामुळं आता पवारांकडे आल्यावर शांत झोप लागेल का ? या प्रश्नावर पाटलांनी नो कमेंट्स म्हटलं.

अद्याप निवडणुकीची घोषणा आणि महायुती तसंच महाविकास आघाडीचं जागा वाटपही झालेलं नाही. त्यामुळं इनकमिंग आणि आऊटगोईंगची जोरदार इनिंग सुरु झालेली नाही. मात्र भाजपला अनेक धक्के बसतील हे पवारांनी सूचकपणे सांगितलं आहे.