मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. अजित पवार असं काही करतील, याची मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर ती शक्यता काल रविवारी खरी ठरली. अजित पवार उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. काही आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. काही आमदार अजित पवारांसोबत आहेत.
अजित पवार यांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ते चित्र पुढच्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल. पण यावेळी अजित पवार यांचं बंड फसण्याची शक्यता फार कमी आहे.
असाच प्रयत्न फसलेला
मागच्यावेळी 2019 मध्ये अजित पवार यांनी असाच प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सरकार स्थापनेसाठी शिवेसना आणि काँग्रेससोबत बोलणी सुरु होती. या दरम्यान अचानक एकदिवस सकाळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पण आता तसा धोका नाही
सर्वसामान्यांसाठी हा मोठा राजकीय धक्का होता. त्यावेळी काही तासातच अजित पवारांना पाठिंबा नाही, असं शरद पवारांकडून जाहीर करण्यात आलं. त्यावेळी सरकार काही तासात कोसळलं. आता सुद्धा शरद पवारांनी असंच जाहीर केलय. पण आता फडणवीस सरकारला कुठलाही धोका नाहीय. शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंमुळे हे सरकार स्थिर आहे.
आमदार समोर येऊन बोलत आहेत
उलट अजित पवारांच्या येण्याने ताकत आणखी वाढली आहे. अजित पवारांसोबत किती आमदारा आहेत? ते लवकरच समजेल. पण काही आमदारांनी आता समोर येऊन बोलायला सुरुवात केली आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवारांच समर्थन करत असल्याचं सांगितलं.
आमदारांनी आता पाठिंबा कसा दिला?
त्यावेळी त्यांना अजित पवारांना बहुतांश आमदारांनी पाठिंबा कसा दिला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात अजित पवारांनी विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला, असं उत्तर दिलं. म्हणजे मतदारसंघात विकास दादांमुळेच घडू शकतो, अशी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची भावना आहे. याच कारणामुळे 2019 मध्ये एकट्या पडलेल्या अजित पवार यांना, यावेळी राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची साथ लाभू शकते.