कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज तब्बल पाच वर्षांनंतर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज ठाकरे आज कोल्हापूरला पोहोचताच ताराराणी चौकात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या स्पिकरवर गाणी लावण्यात आले होते. तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत कण्यात आलं.
मनसेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीकडून राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पत्र अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत आले आहेत. कोल्हापुरात राज ठाकरे दाखल होताच त्यांचं ताराराणी चौकात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर ताराराणी चौक ते विश्रामगृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.
बाईक रॅलीनंतर राज ठाकरे कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना काय सूचना करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे पक्षाच्या कार्यानिमित्ताने पहिल्यांदाच कोल्हापुरात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. ठाकरे पिता-पुत्र उद्या देखील कोल्हापुरात राहण्याची शक्यता आहे. ते उद्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते कोकणाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
राज ठाकरे यांचे पुढील दौरे कसे असतील?
राज ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पुढील दौऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
“मी उद्यापासून कोकणाचा दौरा सुरु करतोय. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन दौरा सुरु करावा असं मी ठरवलं. उद्या सकाळी मी दहा वाजेच्या सुमारास देवीचं दर्शन घेईन. कुठे चांगलं तांबडं-पांढरा मिळालं तर खाईन. त्यानंतर पुढे सावंतवाडीला जाईन”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
“माझा मध्यंतरी नागपूरचा दौरा झाला. माझा कोकणाचा दौरा संपला की पुढचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असा दौरा असेल”, अशी माहिती त्यांनी दिली.
“तुम्हाल कोणी रणनीती सांगितलीय का? मी इथे आलोय ती तयारीच समजा. आता पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यांना काय सांगायचं ते सांगेन. निवडणुकीच्यादृष्टीने काय पावलं उचलायचं ते सांगेन”, असं ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं.
“मी नागपूरलाही ही गोष्ट बोललो असतो. आपला लढा हा प्रस्थापितांविरोधातच असतो. शेवटी यश येतो. १९९५ आणि १९९९ मध्ये पाहिलेलं आहे. बालेकिल्ला हलत नाही असं होत नाही. ते यापुढेही होईलच”, असं ते म्हणाले.
“लक्ष देणं हे आमचं काम आहे ते मी करतोय. तुम्हाला बोलवून लक्ष देतोय असं सांगावं लागत नाही. अंतर्गत काम सुरु असतं. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती होतात. काही ठिकाणी बदल होतात”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आम्ही मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार”, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
“तुम्ही पूर्वपार बघत आलात तर राजकीय पक्षावर चिंधळे उडवले गेले आहेत पूर्वीपासून. ज्यांना आमची ताकद बोचते ते अशाप्रकारचे आरोप करत सूटतात. यांचे विरोधक दोन दिवसांपूर्वी सांगायचे की त्यांच्यासाठी काम करतात. मी कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतो”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.