छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी झाली. पोलीस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाबाहेर आणत असताना शिवप्रेमी त्याच्या अंगावर धावून गेले. पण त्याचवेळी सर्तक असलेल्या पोलिसांनी रोखलं. म्हणून पुढची अप्रिय घटना टळली. वेगवेगळ्या घटनांचा तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी हवी असा युक्तीवाद कोल्हापूर पोलिसांच्यावतीने कोर्टात करण्यात आला.
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली. प्रशांत कोरटकरने ज्या मोबाईल फोनचा वापर केला, तो आता पोलिसांना हस्तगत करायचा आहे. त्याचा जो प्रवास झाला, त्याला कोणी-कोणी मदत केली? ते पोलिसांना शोधून काढता येईल. पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. ज्या-ज्यावेळी पोलिसांना तपासात आवश्यक असेल, तेव्हा सहकार्य करु असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. पण कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोर्टात काय युक्तीवाद झाला?
प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती असा युक्तीवाद आरोपीचे वकील सतिश घाग यांनी कोर्टात केला.
प्रशांत कोरटकरवर लावलेल्या कलमानुसार त्याच्या अटकेची गरज नव्हती, असं त्याच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं.
राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे, असं वकील असिम सरोदे म्हणाले.
प्रशांत कोरटकरची विधानं गंभीर आहेत. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
आरोपी महिन्याभरापासून फरार होता. त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे. म्हणून त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांनी कोर्टात केली.
प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले. कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टात युक्तीवाद करताना सांगितलं.