नाशिकः आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड गावातजवळ घडली आहे. या भीषण अपघातात काका-पुतण्यासह 14 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, यात मुलाच्या शरीराचे अक्षरशः तुकडे-तुकडे झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कसा घडला अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाण्याकडून उंबरठाणकडे एक आयशर टेम्पो (एम. एच. 15 एफ. व्ही. 0241) जात होता. या टेम्पोने सूर्यगड गावाजवळील उतारावर उंबरठाणकडून येणाऱ्या दुचाकीला (एम.एच.15 बी.एस.6675) जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले. त्यामुळे दुचाकीचे चाक निखळून पडले. दुचाकी टेम्पोसोबत फरफटत जाऊन चिखलात रुतली. त्यात तिचा चक्काचूर झाला. मृतांमध्ये गणेश डंबाळे (वय 24), सोमनाथ पवार (वय 42) आणि अश्विन पवार (वय 14) हे तिघे ठार झाले.
सोशल मीडियावरून कळाली नावे
मृताचे नावे सोशल मीडियावरून पोलिसांना कळाली. मृतांतील तिघांपैकी एकाने बोरदैवत गावाचे नाव छापलेला टीशर्ट घातला होता. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली. ही बातमी बोरदैवत गावातही पोहचली. तेव्हा गावातील एका व्यक्तीने हा टीशर्ट सुरगाणा येथील वापरायला दिल्याचे उघड झाले. त्याच व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला.
मृतात काका-पुतणे
मृतांमध्ये सोमनाथ पवार आणि अश्विन पवार यांचा समावेश आहे. हे दोघे नात्याने काका-पुतण्या असल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की अश्विनच्या शरीराचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते. घटनास्थळावरचे चित्रही मोठे ह्रदद्रावक होते. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
चार वाहनांना उडवले
नाशिकच्या तरण तलाव सिग्नलवर मद्यधुंद चारचाकी वाहन चालकांने चार वाहनांना उडवले आहे. दोन दुचाकी आणि दोन चार चाकी वाहनांना त्याने जोरदार धडक दिली. मद्यधुंद वाहनचालक त्रंबकेश्वर मार्गे नाशिक शहरात करत होता. या घटनेत दुचाकीचालक गंभीर जखमी आहे. मद्यधुंद वाहन चालकाला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इतर बातम्याः
Nashik| साहित्य संमेलनासाठी 7000 जणांची बैठक व्यवस्था तयार; पावसामुळे कार्यक्रम स्थळांचे फेरनियोजन