नाशिक – नाशिक जिल्ह्यात (Nashik Accident) कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ भीषण अपघात (Car and Tractor Accident) झाला आहे. ट्रॅक्टर एका कारवर कलंडून झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू (Accident Death) झाल्याची अधिकृत माहिती असून, एकूण अपघातात सात जण मृत झाल्याचे सांगण्यात येते आहे. यात काही जण जखमीही झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या डोंगराजवळ मार्कंडेय डोंगराच्या जवळ असलेल्या मुळाणे बारी येथील ही घटना आहे. या अपघातात ट्रॅक्टर कारवर कलंडली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचे काही भयानक फोटोही समोर आले आहेत. जे पाहून कुणाचेही काळीज करपेल.
जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा या अपघातात आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात मोठा भीषण होता, ट्रॅक्टर कारवर कलंडल्याने, कार पूर्णपणे ट्रॅक्टरखाली अडकल्याचे अपघाताच्या फोटोंमध्ये दिसते आहे.
या अपघाताचे फोटो पाहिल्यास या वाहनांची अवस्था पाहून या अपघाताची दाहकता लक्षात येते. या अपघातात या दोन्ही वाहनांचा अगदी चेंदामेंदा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाढऱ्या रंगाची ही पूर्ण ट्रॉलीच्या खाली दबली आहे. या गाडीचा नंबरही या फोटोतून सहज दिसत आहे. MH 41 AZ 1005 असा या पांढऱ्या कारचा नंबर आहे. मात्र या ट्रॅक्टरचा नंबर या फोटोतून दिसून येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मळते आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यानेही अनेक जण प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.