साईनाथ जाधव, Tv9 मराठी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात आज सकाळपासून ईडीचं धाडसत्र (ED Raid) सुरु होतं. ईडीने आज सकाळी हसन मुश्रीफ यांच्या कागल (Kagal) येथील राहत्या घरी धाड टाकली होती. तसेच सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यावर ईडीचे अधिकारी (ED raid on sugar factory) दाखल झाले. ईडीचे आठ ते दहा अधिकारी सकाळी सहा वाजताच साखर कारखान्यावर दाखल झाले होते. साखर कारखान्यावर ईडीचे जवळपास तीन पथकं होती. या तीनही पथकांकडून सलग 14 तास कारखान्यात चौकशी केली गेली.
या चौकशीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कारखान्यामधून महत्त्वाची कागदपत्रे घेतली आणि सोबत नेली आहेत. हे सर्व कागदपत्रे तपासणीसाठी घेतल्याचं कारण सांगण्यात आल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची ईडी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.
ईडी अधिकाऱ्यांनी 14 तासांमध्ये संपूर्ण साखर कारखाना पिंजून काढला. अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळी ईडीचे तीनही पथकं महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मुंबईच्या दिशेला रवाना झाली. हे तीनही पथकं पोलिसांच्या मोठ्या फौजफाटेसह मुंबईच्या दिशेला रवाना झाली.
हसन मुश्रीफ यांच्या घरी 12 तास चौकशी
ईडी अधिकाऱ्यांनी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी देखील धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी आज दिवसभर मुश्रीफ यांच्या घराची झडती घेतली. तसेच मुश्रीफ कुटुंबियांची कसून चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ईडी अधिकारी घरातून बाहेर पडले.
ईडी अधिकारी गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. “चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलंय. सकाळपासून जी कार्यकर्ते थांबली आहेत त्यांचे आभार मानतो. चौकशीला आम्ही उत्तर दिलेलं आहे”, असं नाविद मुश्रीफ यांनी सांगितलं.
“हे तर राजकीय होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे. त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले. त्याला आम्ही सक्षमपणे उत्तर दिले. सकाळी सात वाजता आले होते. साहेबांशी बोलणं झालेलं नाही”, अशी माहिती त्यांनी दिली.
“जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही”, असं नाविद यावेळी ठामपणाने म्हणाले.
“अधिकारी त्यांचे काम करत होते. त्यांना वरुन फोन येत होते. त्या पद्धतीने ते काम करत होते. जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. आमच्या कार्यकर्त्यांना ते चार दिवसांपासून सांगत होते. काहीतरी होईल, असं बोलत होते. वरचे कोण आहेत ते नेमकं माहिती नाही”, असं नाविद म्हणाले.