रत्नागिरी : समुद्रावर गाडी नेणं काही अतिउत्साही पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात काही अतिउत्साही पर्यटक घेऊन गेले. उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पर्यटकांच्या तब्बल तीन गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या. मात्र दैव बलवत्तर म्हणून हर्णे गावातील मच्छिमार या पर्यटकांच्या मदतीला धावले. स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या गाड्या बाहेर काढण्यात यश आलं.
सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. असेच काही पर्यटक दापोलीतील हर्णे बंदरात मच्छि खरेदीसाठी किनाऱ्यावर भरणाऱ्या मार्केटमध्ये गेले होते. पर्यटक मच्छी खरेदी करत असताना त्यांनी पर्यटकांनी गाड्या मात्र समुद्रच्या अगदी जवळ लावल्या. त्याचवेळी उधाणाच्या भरतीला सुरुवात झाली आणि तीन गाड्या समुद्राच्या पाण्यात अडकल्या. यामध्ये दोन कार आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर होती.
गावातील स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार बांधव गाड्या पाण्याखाली गेल्या असे ओरडू लागल्यावर या गाडीतील पर्यटकांचे आणि गाडीमालकांचे लक्ष गेले. तातडीने एक छोटी मोटार सर्व ग्रामस्थांनी मिळून ढकलून बाहेर काढली तर दुसरी मोटार येथील स्थानिक चालक मल्लू यादव आणि नंदकुमार शिंदे यांच्या बैलगाडीला दोर बांधून बाहेर काढण्यात आली. तर टेम्पो ट्रॅव्हलर करीता तातडीने गावातील काकडे यांचा ट्रॅक्टर बोलावून त्याला मोठा दोर बांधून बाहेर काढण्यात आली.
हर्णे बंदरात असा प्रकार पहिल्यांदाच घडला. स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांमुळे सर्व गाड्या व्यवस्थित बाहेर पडल्या..ग्रामस्थ सांगत असताना देखील पर्यटकांच्या आतातायीपणामुळे हे प्रकार अतिउत्साही पर्यटकांमुळे घडतात.